
Devendra Fadnavis : मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावला नाही. ओबीसींच्या ताटातलं काढून घेण्याचं काम आम्ही कुठेही केलेलं नाही. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे कुठलेही अहित झालेले नाही, आमचे सरकार आहे तोवर ते कोणत्याही परिस्थिती होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलं. ते म्हणाले, मराठवाड्यात इंग्रजांचं शासन नव्हतं. 1948 पर्यंत निजामाचे शासन होते. त्यामुळे मराठवाड्यात जर एखाद्याला जातीचे प्रमाणपत्र हवे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही. महाराष्ट्रात इतर सगळ्या भागात आपण एखाद्याला जर जातीचं प्रमाणपत्र हवं असेल तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे, ते आपण काढतो. त्यानुसार जातीप्रमाणे प्रमाणपत्र दिलं जातं.
परंतु मराठवाड्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हैदराबाद गॅजेटमध्ये आहे. इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबाद गॅजेटमधील रेकॉर्ड चालेल असा निर्णय आपण घेतला आहे. ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे.
त्यामुळे यातून ओबीसींचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काहीही झाले तरी ओबीसींचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. ओबीसींकरता मंत्रालय तयार करणारं, महाज्योती तयार करणारं, ओबीसीची महामंडळे सक्षम करणारे, तेरा वेगवेगळी महामंडळे तयार करणारं, ओबीसी करता परदेशी शिक्षण देणारं, ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणारं हे सरकार आहे.
जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढणाऱ्या अठरापगड जातींना आम्ही मुख्य प्रवाहात आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य पूर्ण होणार नाही. ओबीसींचा विकास हेच शिवकार्य आहे ते शिव कार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही. त्यामुळे कुणीही मनात शंका ठेऊ नका असं आवाहन फडणवीसांनी केलं.
फडणवीस पुढे म्हणाले, इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात, तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू. आमच्या सरकारची नीती पक्की आहे, एकाचे काढून असे दुसऱ्याला देणार नाही असा शब्द फडणवीसांनी ओबीसी बांधवांना यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.