Mumbai News, 18 Jun : धुळे विश्रामगृहावर सापडलेल्या 1 कोटी 85 लाख रुपयांच्या रोख रकमेबाबतचा वाद अद्याप सुरूच आहे. या विषयावरून ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवाय या प्रकरणात अनेक अधिकारी आणि नेत्यांचे लागेबांधे असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून केला जात आहे.
अशातच आता धुळे विश्रामगृहावर सापडलेल्या रकमेबाबतच्या तपशिला संदर्भात दिरंगाई होत असल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी हे प्रकरण सर्वच पातळीवर सुरुवातीपासून दडपण्याचा आणि भ्रष्टाचारांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं आहे.
शिवाय धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही तर या प्रकरणाशी संबधित इतर स्फोट नाईलाजाने करावे लागतील, असा इशाराच राऊतांनी पत्रातून दिला आहे. संजय राऊतांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.
त्यांनी पत्रात लिहिलं की, भ्रष्टाचारी तुरुंगात जातील, एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार, नाही असे आपण अधूनमधून सांगत असता. मात्र, गेल्या काही वर्षांत आपण भाजपचे डम्पिंग ग्राऊंड करून भ्रष्टाचारात बरबटलेला सर्व कचरा स्वपक्षात सामील करून घेतला व त्यांचे समर्थनही आपण करता. त्यामुळे खरे फडणवीस नक्की कोणते असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, अशा शब्दात त्यांनी सुरूवातीलाच फडणवीसांना टोला लगावला आहे.
त्यांनी पुढे लिहिलं की, महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारे एक प्रकरण धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात घडले. माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केलेल्या या प्रकरणात 21 मेच्या मध्यरात्री विश्रामगृहाच्या खोली क्र.102 मध्ये 1 कोटी 85 लाखांचे घबाड सापडले. या खोलीतून 3 कोटी रुपये आधीच बाहेर नेले व 10 कोटी जालन्यात पोहोचवले.
धुळे दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या 'पीए'च्या खोलीत ही रक्कम होती व धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना 'नजराणा' देण्यासाठी खंडणीरूपाने 15 कोटी रुपये जमा करण्यात आले. यामुळे देशभरात खळबळ उडाली. सुरुवातीपासून हे प्रकरण सर्वच पातळीवर दडपण्याचा व भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला.
जनक्षोभ वाढला तेव्हा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 'एसआयटी' स्थापन करण्याची वरपांगी घोषणा आपण केली. त्या एसआयटीचे पुढे काय झाले? त्याचे प्रमुख कोण? सदस्य कोण? हे समजले नाही. त्यामुळे एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. आता असे समोर आले की, SIT राहिली बाजूला, खंडणीरूपाने जमा केलेल्या या रकमेबाबत एक साधा 'अदखलपात्र' गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण दडपण्यात आले.
ही बाब लाजिरवाणी व आपण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किती गंभीर आहात हे दर्शविणारी आहे. भ्रष्टाचाऱ्यांना अभय देण्याचाच हा प्रकार आहे. आपल्या राज्यात हे असेच चालणार असेल तर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून मोकळे व्हा व भ्रष्ट अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना 'महाराष्ट्र भूषण' व त्यांचे 'पीए' किशोर पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करा असे मी आपणास सुचवीत आहे, अशा शब्दात त्यांनी खोतकरांना डिवचलं आहे.
प्रिय देवेंद्रजी, धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाला तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. विश्रामगृहावर सापडलेले घबाड हे अंदाज समिती अध्यक्षांना 'नजराणा' देण्यासाठीच गोळा केले. माझ्या माहितीप्रमाणे धुळे शहरातील व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून अंदाज समिती अध्यक्षांना देण्यासाठी ही रक्कम गोळा केली.
त्या पिशवीवर 'R' लिहिले होते. धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने तोंडी आदेश देऊन शहरी व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी 10,000 प्रमाणे 1 कोटी 47 लाख रुपये गोळा केले. ही रक्कम फक्त तीन तासांत गोळा केली. पैसे जमा झाले नाहीत तर 'समिती'चे सदस्य दुकानांवर रेड टाकतील, असे निरोप देण्यात आले व त्यानंतर पैसे जमा केले.
याबाबतची अधिक माहिती हवी असेल तर ती मिळू शकेल. आपल्या राज्यातला भ्रष्टाचार विधिमंडळाच्या समित्यांपर्यंत पोहोचला आहे व आपण फक्त राजकीय मसलती व उद्योग-व्यापारात गुंतून पडला आहात. धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील. तूर्त तरी अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांना महाराष्ट्र भूषण व त्यांच्या पीएंना 'पद्मश्री'ने सन्मानित करून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांचा बहुमान करावा असे मी आपणास सुचवीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.