Dhule Lok Sabha Constituency : डॉ.सुभाष भामरेंच्या मार्गात वय, पक्षांतर्गत स्पर्धकांचा अडसर...!

Dhule Political News : भामरे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी एकत्र येऊन येथून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला आहे.
 Dr. Subhash Bhamre
Dr. Subhash Bhamresarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी काँग्रेसचे नेते अमरीशभाई पटेल आणि आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केला होता. हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो, मात्र येथे गेल्या तीन निवडणुकांत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. डॉ.भामरे यांनी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभेला हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने त्यांनी 2014 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा खासदार झाले. गेल्या दोन निवडणुका त्यांनी भाजप-शिवसेना युती म्हणून लढवल्या. हा मतदारसंघ भाजपलाच मिळण्याची शक्यता अधिक आहे.

भाजपने सत्तर वर्षे वय असलेल्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण स्वीकारल्याचे बोलले जाते. त्यावर ते ठाम असल्यास डॉ. भामरे यांची अडचण होऊ शकते. अन्यथा त्यांना उमेदवारी मिळण्यात अडचण नाही. डॉ. भामरे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी एकत्र येऊन येथून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला आहे. त्यात डॉ. भामरे यांचे विरोधक कितपत यशस्वी होतात, याची उत्सुकता आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, बाह्य आणि शिंदखेडा हे तीन धुळे जिल्ह्यातील तर सटाणा, मालेगाव शहर आणि बाह्य हे तीन नाशिक जिल्ह्यातील असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा मतदारसंघांत सध्या भाजपचे दोन, `एमआयएम`चे दोन आणि काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार आहे. मतदारसंघात मालेगाव आणि धुळे या दोन महापालिका असून त्यावर राष्ट्रावदी काँग्रेस (अजितदाद पवार गट) आणि भाजपची सत्ता आहे. येथे प्रमुख विरोधक म्हणून काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आपले स्थान टिकवून आहेत. गेल्या दोन निवडणुका मोदी लाटेवर स्वार होत आणि मुस्लिम मतांचे विभाजन करून भाजपने एकतर्फी जिंकल्या. यंदाही भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठेची हवा निर्माण केली आहे. त्यात ते किती यशस्वी होतात, हे भविष्यात दिसून येईल.

नाव (Name)

डॉ. सुभाष रामराव भामरे

जन्म तारीख (Birth Date)

11 सप्टेंबर 1953

शिक्षण (education)

एमबीबीएस., एमएस. (जनरल सर्जरी अँड सुपर स्पेशलायझेशन आँको सर्जन)

 Dr. Subhash Bhamre
khadse Vs Mahajan : विस्तव पुन्हा पेटला; खडसेंनी महाजनांना कोर्टात खेचलं; महाजनांची किंमत 1 रुपया

कौटुंबिक पार्श्वभूमी (family background)

खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे वडील दिवंगत रामराव भामरे हे काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या मातोश्री गोजराबाई रामराव भामरे या साक्री मतदारसंघाच्या (१९७२) पहिला महिला आमदार होत्या. वडिलांचा वारसा खासदार भामरे यांनी पुढे चालवला. डॉ. भामरे यांनी कर्करोगासंदर्भात एक शोधप्रबंध सादर केलेला आहे. त्यांनी जे. जे. रुग्णालय, ग्रांट मेडीकल महाविद्यालय आणि टाटा कर्करोग रुग्णालय (मुंबई) येथे वैद्यकीय तज्ञ म्हणून काम केले आहे. त्यांच्या त्यांच्या पत्नी बिना या गृहिणी आहेत. त्यांचे पुत्र डॉ. राहुल भामरे हे धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटरचे संचालक असून, रोहन भामरे हे अभियंता आहेत.

नोकरी/ व्यवसाय (Service/Business)

वैद्यकीय व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ (lok sabha constituency)

धुळे

राजकीय पक्ष (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष

 Dr. Subhash Bhamre
MP Sujay Vikhe : ...म्हणून खासदार विखेंनी रोहित पवारांच्या मतदारसंघातला कार्यक्रम 10 मिनिटांतच उरकला

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

डॉ. भामरे यांनी 2004 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. 2019 मध्येही त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

डॉ. भामरे हे धुळे येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यातून त्यांचा समाजातील विविध घटकांशी संपर्क कायम आहे. हंगेरी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कर्करोग परिषदेत स्तनाच्या कर्करोगावर त्यांनी शोधनिबंध सादर केला आहे. विविध मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरे त्यांनी आयोजित केली. समाजात कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

डॉ. भामरे यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना 6 लाख 13 हजार 533 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा 2 लाख 29 हजार 243 इतक्या मताधिक्क्याने पराभव केला.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or losing the Election)

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे दुसऱ्यांदा विजयी झाले. पहिल्या टर्ममध्ये ते केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री होते. त्यांनी संसदेच्या विविध समित्यांवर काम केले होते. या पदांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाच्या मोठ्या योजनांना मंजुरी मिळवली होती. त्याचा जोरदार प्रचार त्यांनी निवडणुकीत केला. त्याला मतदारांकडून प्रतिसाद मिळाला. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपने विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याला प्राधान्य दिले होते. यामध्ये धुळे मतदारसंघातील अमरीशभाई पटेल यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी, विरोधी पक्षांना प्रभावी प्रचारयंत्रणा राबवण्यात अडचणी आल्या. त्याचा लाभ डॉ. भामरे यांना झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुलवामा लष्करी तळावर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला आणि त्यातून भाजपने सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्यात आणि हिंदू, मुस्लिम अशी मतविभागणी करण्यात यश मिळवले. त्याचा परिणाम धुळे मतदारसंघाच्या निकालावर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांवर मोठ्या प्रभाव निर्माण करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे मोदी लाट भाजपच्या डॉ. भामरे यांच्या पथ्यावर पडली.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी डॉ. भामरे त्यांनी सातत्याने दौरे केले. विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी गावपातळीपासून संपर्क निर्माण केला आहे. आदिवासी तसेच शहरी भागांतील नागरिकांशी त्यांचा संपर्क आहे. हा जनसंपर्क वाढविण्यासाठी व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना त्यांनी मंजूर केल्या आहेत.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

मतदारसंघातील शहीद जवान योगेश भदाने यांना मदत मिळवून देण्याबाबत आरोप- प्रत्यारोप झाले होते. आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपावर डॉ. भामरे यांनी 98.88 लाख रुपये मदत मिळवून दिल्याचा दावा करून गोटे यांनी पंतप्रधान व लष्कराचा अवमान केला, असे प्रत्युत्तर दिले होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले होते. या सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

आई दिवंगत गोजराताई रामराव भामरे आणि वडील रामराव सीताराम भामरे.

सकारात्मक मुद्दे (Positive points about Candidate)

गेल्या दोन टर्मपासून धुळे मतदारसंघावर डॉ. भामरे यांचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील बहुतांश सत्तेची पदे भाजपकडे आहे. हा पक्ष विरोधकांत फूट पाडण्यात यशस्वी झाला आहे. सत्तेच्या पदांमुळे सत्तेसोबत राहणारा गट त्यांना अनुकूल असतो. त्याचा लाभ त्यांना आजवर प्रत्येक निवडणुकीत होत आला आहे. आर्थिकदृष्या डॉ. भामरे प्रबळ आहे. मतदारसंघात त्यांनी मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक संपर्क निर्माण केला आहे. विविध योजना राबविल्या आहेत. त्यातून ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला, तो मोठा गट त्यांच्या संपर्कात आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यात बागलानण मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. मतदारसंघात भाजपची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजितदाद पवार गट भाजपसोबत गेला आहे. असे असले तरी जागावाटपात धुळे मतदारसंघात भाजपकडेच राहण्याची शक्यता अधिक आहे. काँग्रेसकडून नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपकडून खासदार डॉ. सुभाष भामरे, धुळे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते, पक्षप्रवेश केलेले निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली पक्षाने तरूण व नव्या चेहऱ्याचा विचार केला तर त्यात स्थान पटकावण्याच्या दृष्टीने सभापती दहिते रिंगणात उतरले आहेत, तर दिघावकर हेही स्पर्धेत उतरले आहेत. शिंदे गट आणि भाजपची सोय म्हणून नाशिक आणि धुळे मतदारसंघांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. त्यात स्वतः मंत्री भुसे यांना येथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मालेगाव शहर, धुळे शहर आणि अन्य काही भागांत अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. येथे यंदा सरळ लढत झाल्यास भाजपच्या उमेदवाराला अँटीइनकमबन्सीचा फटका बसू शकतो.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

भाजपने मध्यंतरी 70 पेक्षा अधिक वय असलेल्यांना उमेदवारी न देण्याचे जाहीर केले होते. त्या स्थितीत दोन टर्म खासदार असलेल्या माजी राज्यमंत्री डॉ. भामरे यांची उमेदवारी हुकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पक्षात तीन ते चार जण इच्छुक म्हणून चर्चेत आहेत. भाजपकडून दोन टर्म खासदार असल्याने पुन्हा उमेदवारी मिळेल असा डॉ. भामरे यांचा दावा आहे. मात्र उमेदवारीच्या अपेक्षेने निवृत्त पोलिस उपमहानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. दिघावकर वरिष्ठ नेत्यांच्या सातत्याने भेटीगाटी घेत आहेत. भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचे व्याही भाजपचे नेते सुभाष देवरे, त्यांच्या स्नुषा व पाटील यांच्या कन्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे आणि बंदरे व खनीकर्म मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे हेही शिंदे गटाकडून खासदारकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही.

(Edited By Roshan More)

 Dr. Subhash Bhamre
Uddhav Thackeray: भाजप, बजरंग दल, 'विहिंप'ला ठाकरे गटाकडून खिंडार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com