Ahmednagar News: कर्जत तालुक्यात भाजपचे खासदार सुजय विखे यांनी आनंदाचा शिधा,साखर आणि डाळ वाटप केली.मात्र, या कार्यक्रमाला भाजप आमदार प्रा. राम शिंदे हे अनुपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी आमदार शिंदे यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या सोहळ्याच्या प्रसादासाठी लाडू तयार करण्यासाठी खासदार विखे यांनी कर्जतमध्ये साखर आणि डाळ वाटली. परंतु आमदार राम शिंदेंच या कार्यक्रमाला अनुपस्थितीत राहिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) म्हणाले, 'प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक सोहळा एकट्या भाजपचा नसून हा सर्व भारतीयांचा सोहळा आहे. आज वेळ कमी होता. उन्हात जनता बसली आहे. त्यामुळे व्यासपीठावरील लोकांनी भाषण न केल्याने साखर गोड लागेल. अन्यथा भाषणात वेळ गेला असता तर रोषास सामोरे जावे लागते', असे त्यांनी सांगितले.
कर्जत येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने आनंदाचा शिधा, साखर आणि डाळ वाटप कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, अभय पाटील, भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमरे उपस्थित होते. मात्र, राम शिंदेंची (Ram Shinde) अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती.
खासदार विखे म्हणाले, प्रभू श्रीरामांचा हा सोहळा सर्वांनी मोठ्या जल्लोषात साजरा करावा. याच पार्श्वभूमीवर साखर आणि डाळ वाटप करण्यात येत आहे. या साखर आणि डाळीचे दोन लाडू बनवून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करावे. मात्र, ज्यांनी लाडू केले नाही त्यांचा बंदोबस्त करा, असे आपण प्रभू रामांना आपण सांगणार आहोत. साखर मीच दिली आहे. हे प्रत्येकाना दिसेल. कारण प्रत्येक पिशवीवर आणि साखरेच्या पुड्यात माझे फोटो आहे. मी घरी दिसेल याची व्यवस्था मी अगोदरच केली आहे. कार्यक्रमास उशीर झाल्याने अवघ्या दहा मिनिटांत खासदार विखे यांनी कार्यक्रम उरकला. खासदार विखे स्वतः टोकन जमा करत साखर आणि डाळ वाटप करत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार सुजय विखे हे कर्जत मतदारसंघात दिवसभर उपस्थित असताना आमदार राम शिंदे मात्र कार्यक्रमास कुठेच दिसले नाही. सध्या विखे-शिंदे यांच्यातील राजकीय युद्ध जिल्ह्यास सर्वश्रुत आहे. मात्र या कार्यक्रमास दोघे सोबत दिसले असते, तर आणखी सकारात्मक संदेश गेला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.