Shivsena, NCP politics news : बाजार समित्यांच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचे पॅनेल व्हावे असे प्रयत्न आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनेलमध्ये लढत आहे. त्यामुळे भाजपसह अन्य सर्व पक्ष नाममात्र आहेत. ही निवडणूक बाजार समितीपेक्षा विधानसभा निवडणुकीची चाचणी आहे. (Not Mahavikas Aghadi but fight in NCP & Shivsena)
पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या (APMC election) निवडणुकीत दोन्ही पॅनेलचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. मात्र सगळ्यांना माघार कोण घेतो याची प्रतिक्षा आहे. शेवटच्या चार दिवसांत उमेदवारांना आपला मार्ग मोकळा करण्यासाठी गैरसोयीच्या उमेदवारांच्या माघारीवर भर द्यावा लागेल. आमदार बनकर (Dilip Bankar) यांचे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांवर तर माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांचे ग्रामपंचायत गटावर वर्चस्व असल्याने ही निवडणुक रंगतदार होईल असे चिन्ह आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी पिंपळगाव बाजार समितीच्या रणधुमाळीने निफाड मतदारसंघाचे राजकारण ढवळून निघाले आहे. कुठे तरी आपले अस्तित्व असावे यासाठी या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातून तब्बल ३०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पंधरा अर्ज बाद झाल्यानंतर आता २९४ अर्ज शिल्लक असून माघारीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्या गटात १८ जागांसाठी काटे की टक्कर होईल.
निवडणुकीचा ज्वर मात्र चढला असून वेगवेगळ्या चर्चांना तसेच काय भाव फुटणार याबाबत उधाण आले आहे. दरम्यान आमदार बनकर यांनी निर्माण केलेल्या सहा सोसायट्याच्या संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतची सुनावणी आता उच्च न्यायालयाने ६ जूनला ठेवली आहे. त्यामुळे त्या ७८ मतांचा विषय या निवडणुकीपुरता तरी संपल्यात जमा आहे.
पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी त्रिशतक गाठत धो धो पावसासारखे अर्ज दाखल झाले. एका जागेसाठी सोळा अर्ज अशी सध्याची स्थिती आहे. उमेदवार अर्ज माघार प्रक्रिया सुरू होऊन पाच दिवस उलटले पण अद्याप एकही इच्छुक माघारीसाठी पुढे आलेला नाही.
आता माघारीचा शेवटचा दिवस गुरूवार (ता.२०) आहे, त्यानंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल. तत्पुर्वी आमदार बनकर व कदम यांच्याकडे उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांकडून फिल्डींग लावली जात आहे. दोघांना इच्छुकांची बंडखोरी थोपविण्याचे आव्हान आहे. माघारीचा अंतिम दिवस जवळ येऊ लागल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत. नुकत्याच पक्षप्रवेश करणाऱ्या अमृता पवार यांनी भाजपऐवजी माजी आमदार कदम यांच्या गटाशी जुळवून घेतल्याने भाजपही एकसंघ नसल्याचे स्पष्ट दिसते. नवे गट-तट उदयाला येणार असल्याने निफाडच्या राजकारणाला नवा आयाम देणारी पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक ठरणार आहे.
सहा जूनला सुनावणी...
आमदार बनकर यांच्या राजकीय डावपेचाला माजी आमदार कदम यांनी मात केल्याचे सध्या स्थिती आहे. पिंपळगाव बसवंत, पालखेड, तारूखेडले, चांदोरी, करंजगाव या सहा सोसायट्याचे संचालक पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. कारण याबाबतची सुनावणी ६ जूनला होणार असल्याचे न्यायालयाने सुधारीत आदेश काढले आहे. २८ एप्रिलला मतदान होणार असल्याने त्या ७८ संचालकांची नावे मतदार यादी समाविष्ट होण्याची कोणतीच शक्यता नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.