Dindori Lok Sabha Constituency: डॉ. भारती पवार यांना पहिल्याच टर्ममध्ये केंद्रात मंत्रिपद, आता कांदा रडवणार ?

Nashik Political News : लोकसभेला पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉ.भारती पवार या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री बनल्या.
Dr. Bharati Pawar
Dr. Bharati PawarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभेला पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉ.भारती पवार या नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री बनल्या. नाशिक जिल्ह्यातून थेट केंद्रात तसेच पहिल्याच टर्ममध्ये मंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला खासदार आहेत. त्यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास खात्यांची जबाबदारी आहे. डॉ.पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आगामी निवडणुकीत त्या भाजपच्या अर्थात महायुतीचे घटक असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासह निवडणूक लढवतील.

महायुतीच्या जागावाटपात दिंडोरी हा मतदारसंघ निर्विवादपणे भाजपकडे राहणार, हे स्पष्ट आहे. गेल्या चार निवडणुकांत येथे भाजपचा खासदार राहिला आहे. महायुतीच्या सध्याच्या धोरणानुसार ज्या पक्षाचा विद्यमान खासदार त्या पक्षाकडे तो मतदारसंघ राहील, असे संकेत आहेत. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार उमेदवारीबाबत निश्चिंत आहेत. निवडणुकीला देखील त्या तेवढ्याच आत्मविश्वासाने सामोऱ्या जातील, असे सध्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Bharati Pawar
Nashik Politics : मोदींचा दौरा होताच नाशिकमध्ये महायुतीत रंगली वर्चस्वाची लढाई

2014 मध्ये डॉ.भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढल्या होत्या. त्यावेळी मोदी लाटेत त्यांचा भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी पराभव केला. या अनुभवातून धडा घेत त्यांनी पुढची पाच वर्षे तळागाळात जनसंपर्क कायम ठेवला. विविध प्रश्नांवर अतिशय अभ्यासू आणि आक्रमकपणे आवाज उठविण्याची त्यांची शैली आहे.

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी त्यांनी विविध राजकीय तसेच जिल्ह्यातील प्रश्नांवर काम केले होते. प्रदेश उपाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र प्रवक्त्या या जबाबदाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यांना दिल्या होत्या. त्यावर त्यांनी यशस्वीपणे काम करीत आपला ठसा उमटवला. आदिवासी समाजातील उच्चशिक्षित उमेदवार म्हणून देखील त्यांचा एक पाठीराखा वर्ग मतदारसंघात आहे.

नाव (Name) :

डॉ.भारती प्रवीण पवार

जन्म तारीख (Birth Date) :

13 सप्टेंबर 1978

शिक्षण (Education) :

एमबीबीएस

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

डॉ.भारती पवार या कळवण मतदारसंघाचे नऊ वेळा प्रतिनिधित्व केलेल्या तसेच राज्याचे पाटबंधारे राज्यमंत्री राहिलेल्या कै.ए. टी.पवार यांच्या स्नुषा आहेत. डॉ.भारती पवार यांचे पती प्रवीण पवार अभियंता आहेत. डॉ.भारती पवार यांचे वडील कै. किसन बागूल शासकीय नोकरीत होते. बालपणीच वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आई गृहिणी आहेत. त्यांच्या सासूबाई श्रीमती शकुंतला अर्जुन पवार, पती प्रवीण तसेच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, मुले शिक्षण घेत आहेत.

नोकरी/ व्यवसाय (Service/Business) :

वैद्यकीय व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ (lok sabha constituency) :

दिंडोरी

राजकीय पक्ष (Political Party Affiliation) :

भारतीय जनता पक्ष

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey):

डॉ.पवार या 2012 मध्ये उमराणे (देवळा) गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. 2017 मध्ये मानूर (कळवण) जिल्हा परिषद गटातून त्या विजयी झाल्या. 2019 मध्ये त्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार झाल्या. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी देशातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले. त्यासाठी विविध राज्यांत बैठका घेऊन त्यावर उपाययोजना सुचविल्या. मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी सातत्याने काम करून त्यांचे प्रश्न सोडवले.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency) :

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सातत्याने काम केले आहे. वैद्यकीय, शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यात विविध भागांत काम केले. गरजूंना मूलभूत सोयी, सुविधांसाठी त्यांनी परिश्रम घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 300 आरोग्य शिबिरे घेतली आणि 700 रुग्णांवर मोफत ह्रदय शस्त्रक्रिया केली. 8 मे या दिनाला 75 ठिकाणी गरोदर महिलांसाठी शिबिरे घेतली. खासदार म्हणून आरोग्य सेवेसाठी 540 कोटींचा निधी मंजूर केला. त्यात 100 बेडचे क्रिटिकल केअर रुग्णालय मंजूर केले.

कळवण, देवळा आणि अन्य आदिवासी भागांत शिक्षण, रोजगार, ग्रामीण भागात वीज, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी समस्यांचे निराकरण केले. त्यांनी खासदार म्हणून केंद्र व राज्य शासनाशी निगडित तीनशे विविध समस्यांचे निराकरण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक, शैक्षणिक साह्य त्या करत असतात.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election) :

डॉ. पवार यांनी 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांना 5,67,470 (50.30 टक्के) मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांचा त्यांनी एक लाख 98 हजार मतांनी पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात विजयाला गवसणी घातली. भाजपच्या डॉ.पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाले आणि माकपचे जे.पी.गावित या प्रमुख उमेदवारांत ही लढत होती.प्रारंभी चुरशीची वाटणारी ही निवडणूक त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावातून एकतर्फी जिंकली.

डॉ.पवार यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ.पवार यांच्या रूपात भाजपने सलग चौथ्यांदा विजय मिळविला. विशेष म्हणजे, त्यांना सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली. त्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात त्यांना विक्रमी मते मिळाली, हे लक्षणीय. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली होती. त्यांचे उच्चशिक्षित असणे आणि प्रभावी प्रचाराचा त्यांच्या विजयात महत्वाचा वाटा होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election):

डॉ. भारती पवार 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या. या विजया मागे 2014 मध्ये त्या पराभूत झाल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती होती. काँग्रेस आघाडीने डॉ.पवार यांना सदोष राजकीय इनपुटच्या आधारे उमेदवारी नाकारली होती. त्याचा फटका काँग्रेस आघाडीला बसला.

काँग्रेस आघाडीने ऐनवेळी माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. त्यांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. काँग्रेस आघाडीचा प्रचार अतिशय विस्कळीत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली. त्याचा लाभ डॉ.पवार यांना मिळाला.त्यांच्या विजयातमोदी लाटेचा मोठा वाटा होता.

Dr. Bharati Pawar
PM Narendra Modi : मोदींनी जिंकली नाशिककरांची मने...! डॉ. भारती पवारांनी सांगितले कारण...

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने डॉ. पवार यांनी मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. त्यांच्या मतदारसंघातील दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, कळवण आणि चांदवड या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. केंद्रात स्वतः डॉ.पवार आणि राज्यात अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघातील आहेत. यामध्ये भाजप एक, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचा एक आमदार आहे.

त्यांचा जनसंपर्क वाढण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे. मतदारसंघातील आदिवासी तसेच अन्य नागरिक त्यांच्याकडे विविध समस्यांसाठी सातत्याने भेटींसाठी येतात. हा जनता दरबार त्यांनी गेली काही वर्षे नियमितपणे सुरू ठेवला आहे. त्यातून त्यांचा जनसंपर्क टिकून आहे. लोकांच्या भेटीगाठी, जनसंपर्क, धार्मिक, सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग हा पूर्वीपेक्षा अधिक झाला आहे. विविध कौटुंबिक कार्यक्रमांत त्या सहभागी होतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

राज्यमंत्री डॉ. पवार यांनी समाजमाध्यमांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क, शासनाच्या योजना, लाभार्थींना होणारे लाभ यांची माहिती देतात. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करतात. फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम तसेच व्हॉटस्अॅप माध्यमातून त्या लोकांच्या संपर्कात असतात. याद्वारे त्यांच्या कामांची माहिती मतदारसंघातून नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते.भाजपच्या सोशल मीडिया हॅन्डलवर देखील दिंडोरी मतदारसंघाच्या जनसंपर्कासाठी उपयोग करण्यात येतो. डॉ.पवार आपल्या जनसंपर्क दौऱ्याची माहिती, दौरे, भाषणे, मेळावे याची माहिती सोशल मीडिया हॅन्डलवरून देतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

मतदारसंघातील ड्राय पोर्टच्या प्रश्नावर जागा हस्तांतरणास विलंब झाल्याने डॉ.पवार यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले होते. राज्य सरकार याबाबत ठोस कार्यवाही करत नसल्याची तक्रार केली होती. कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यावर शेतकरी नाराज होते. त्यावर त्यांनी केंद्र सरकार सबंध देश डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेते, असे म्हटले होते.

कांद्याच्या प्रश्नावर केंद्र शासनाच्या धोरणाचे समर्थन करताना त्यांनी हिताचेही लक्ष ठेवावे लागते, असे विधान केले होते. शिवसेनेत बंड होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाची बाजू घेताना महाविकास आघाडी सरकारच्या अनेक त्रुटींवर बोट ठेवत टीका केली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru) :

कै.ए.टी.पवार, कै.विनायकदादा पाटील

सकारात्मक मुद्दे (Positive points about Candidate):

डॉ. पवार यांनी मतदारसंघात 19 हजार कोटींहून अधिक निधीचे उपक्रम आणले. त्यात 6,800 कोटींचा एच.ए.एल.साठी 40 विमानांचा प्रस्तावित प्रकल्प आहे. नाफेडमार्फत 750 कोटींच्या ड्राय पोर्टसह 1851 कोटींहून अधिक कामे आहेत. 450 कोटींची एकलव्य निवासी शाळा, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळांसह विकासावर भर दिला. 40 गावांमध्ये चार कोटींची समाज मंदिरे, बुद्ध विहारांसह 70 गावांत अमरधाम बांधले.

आदिवासी कल्याणासाठी 412 कोटींचा निधी मंजूर केला. जलजीवन मिशलअंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी 1292 गावांसाठी 1509 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी 1830 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात केंद्र सरकारच्या भारतमाला या महत्त्वाकांक्षी दळणवळण योजनेंतर्गत 226 किलोमीटर तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत सूरत-चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग मतदारसंघातून जातो.

आरोग्य राज्यमंत्री म्हणून मतदारसंघासह राज्यासाठी विविध प्रकल्प राबविले. टेली मेडीसीन सेवा, आयुष्यमान भारत, रुग्णवाहिका खरेदी, रुग्णालयांचे अद्ययावतीकरण आदी अनेक कामे केली. कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी 2398 कोटींचा निधी महाराष्ट्र शासनाला उपलब्ध करून दिला.

Dr. Bharati Pawar
Chhagan Bhujbal News : जिल्हा बँकेला हवेत भुजबळांकडील 51 कोटी; काय आहे प्रकरण?

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

दिंडोरी हा मतदारसंघ प्रामुख्याने शेतकरीबहुल आहे. त्यात कांदा, द्राक्षे व भाजीपाला हे प्रमुख उत्पादन आहे. केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांता भाजपविषयी नाराजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली. त्याला भाजपचे प्रोत्साहन व पाठबळ होते. त्यामुळे सामान्य नागरिकांसह शिवसेना समर्थकांत त्याबाबत नाराजी आहे.

शिवसेना नेत्यांविषयी सहानुभूती वाढली आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. या मतदारसंघात येवला, निफाड, चांदवडसह सगळीकडे मराठा आरक्षण प्रश्नावर वातावरण तापले आहे. त्यात राज्य व केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाविषयी नाराजीची भावना आहे. त्यातूनच राज्यमंत्री डॉ.पवार यांच्या कार्यक्रमात देखील घोषणाबाजी झाली होती.मतदारसंघात सर्वच्या सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. त्यात येवल्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून अत्यंत नकारात्मक वातावरण आहे.

कांदा निर्यातीच्या निर्यातीवरून चांदवड, निफाड, देवळ्यात देखील तशीच स्थिती आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सेफ वाटत असताना मोदी लाटेत डॉ. पवार जवळपास दोन लाखांच्या मताधिक्क्याने सहज निवडून आल्या होत्या. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. वंचित बहुजन आघाडी, मराठा समाज, शेतकरी आणि मुस्लिम समाज मतदानात महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences) :

राज्यमंत्री डॉ.पवार या उच्चशिक्षित, प्रभावी व्यक्तीमत्व व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुडबुक्समध्ये आहेत. या मतदारसंघात भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांत देखील अन्य कोणीही उमेदवारीसाठी इच्छुक नाही. त्यामुळे डॉ. पवार यांची उमेदवारी हुकण्याची शक्यता दिसत नाही. दिंडोरी हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे.

त्यामुळे येथून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते म्हणून उमेदवारी करू शकतात. डॉ. पवार यांच्या विरोधात 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी केलेले माजी आमदार धनराज महाले सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. हा गट देखील महायुतीचा घटक आहे. त्यांना इच्छुक उमेदवार म्हणून पाहिले जाते.

(Edited By- Ganesh Thombare)

Dr. Bharati Pawar
Shinde Vs Thackeray : शिंदे अन् ठाकरेंचे दोन दिग्गज नेते एकत्र; यातच सामंतांचं राजकीय बॉम्ब टाकणारं वक्तव्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com