Maharashtra Political News : नाशिक मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांचे उमेदवारीचे प्रयत्न पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोडसेंना सबुरीचा सल्ला दिला असला तरी समर्थकांनी मात्र निवडणूक लढून जिंकणार असा पवित्रा घेतला आहे. गोडसेंच्या समर्थकांमुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. Nashik Shivsena
गेल्या आठवडाभर नाशिकची जागा शिंदे गटाला मिळावी, यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर दोनदा नकार मिळाला. आज दुपारी पुन्हा एकदा खासदार गोडसे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी पदाधिकारी नाशिक मतदारसंघाबाबत आग्रही होते. मात्र, महायुतीच्या चर्चेत ही जागा सहकारी पक्षाला गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. तसेच इच्छुकांनी सबुरीने वागावे, असा सल्लाही या वेळी त्यांनी दिला आहे. मात्र समर्थक कुणाचेच ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून येत आहे.
महायुतीच्या जागावाटपात नाशिक, धाराशिव, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, संभाजीनगर आणि पालघर या मतदारसंघाबाबत वाद होता. तिन्ही घटक पक्षातील नेत्यांना हे मतदारसंघ हवे होते. त्याबाबत एकमत होण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या चर्चेत नाशिक आणि धाराशिव हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोडल्याची माहिती आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासाठी भाजपला देण्यात आला आहे. पालघर हा मतदारसंघदेखील भाजपकडे असेल. या तडजोडीमध्ये ठाणे, कल्याण आणि संभाजीनगर हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिळाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेत नाशिकबाबत शिंदे गटाच्या इच्छुकांची कोंडी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. धोरणात्मक निर्णय म्हणून वरिष्ठ स्तरावर असे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे इच्छुकांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी गोडसेंना दिला आहे. दरम्यान, महायुतीच्या या जागावाटपात नाशिकचा मतदारसंघ हातून जाण्याच्या भीतीने खासदार गोडसे यांचे समर्थक चांगलेच संतापले आहेत. त्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर लगेचच उमटली. त्यांनी ''लोकसभा निवडणूक लढणार पण, आणि जिंकणार पण" अशा पोस्ट व्हायरल केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या सबुरीच्या सल्ल्यानंतर खासदार गोडसे यांच्यासह त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे संकेत देत जाहीरपणे नाराजी आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून झालेल्या तडजोडीत शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपला पाठिंबा दिलेला काही खासदारांवर हा मोठा अन्याय असल्याची भावना पसरली आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिकचे राजकीय चित्र कसे असणार याकडे लक्ष असेल. दरम्यान, येथील नाराजीचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.