Maratha Vs OBC : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील दौऱ्यात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्याबाबत पोलिसांनी आता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात भुजबळ यांनीच पत्रकार तसेच कार्यकर्त्यांची नावे सांगितली, असा आरोप केला जात आहे.
यासंदर्भात आंदोलक डॉ. सुजीत गुजांळ यांसह मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याने संतप्त प्रतिक्रीया उमटली आहे. याबाबत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा निषेध करण्यात आला. गुन्हे दाखल केल्याने कार्यकर्ते घाबरणार नाही. या दडपशाहीला आम्ही सर्व संघटीतपणे सामोरे जाऊन योग्य ते उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. गुजांळ यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले, गोरगरीब मराठा समाजाचे युवक आपल्या अधिकारांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी लढा देत आहेत. त्यात मंत्री भुजबळ राजकारण आणत आहेत. त्यांनी पोलिसांवर दबाव आणून सुडबुद्धीने ही कारवाई केली आहे. आम्ही घाबरणार नाही, कारण आम्हाला कोणत्याही राजकीय पदांची अपेक्षा नाही. त्याची काळजी भुजबळांनी करावी. ‘अब बात निकली है, तो बहुत दूर तक जायेगी.’
राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ॲड. माणिकराव शिंदे यांनी देखील भुजबळ यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, भुजबळ 26 डिसेंबरला येवला (Yeola) मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्याचे जगजाहीर होते. मग त्याची बातमी केली म्हणून पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करणे हास्यास्पद वाटते. आंदोलकांनी भुजबळ यांना यापुर्वीच इशारा दिला होता. त्यांनी समजुतदारपणा दाखवत दौरा रद्द करायला हवा होता.
त्याऐवजी महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे का ?, असे सांगून मराठा समाजाला डिवचले. दूरचित्रवाणी प्रतिनिधी, मराठा नेते डॉ. सुजित गुंजाळ व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भुजबळ व त्यांच्या सल्लागाराची हि कृती अनाकलनीय आहे. येवला मतदारसंघात भुजबळांचे राजकारण घसरणीला लागल्याचे ते द्योतक आहे. त्यांनी येवल्यात आणीबाणी लादू नये.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्ही तुम्हाला चार वेळा आमदार केले हे विसरू नका, असा इशारा शिंदे यांनी दिला. याप्रकरणी भुजबळांचा निषेध करत असून येवल्यातील 40 ते 50 टक्के मराठा मतदार त्यांच्या चारही विजयात सहभागी होतेच ना ? आता भुजबळांना येवल्यावर विश्वास राहिला नाही की काय? असा सवाल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
येवल्यात आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू झाली का? लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या भुजबळांच्या या कृत्याची राज्य शासन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दखल घेतील का ? असेही ते म्हणाले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.