Nashik Cooperative politics: "मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतो आहे. तुमच्यासाठी निरोप आहे. 'त्या' अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घ्या." मुख्यमंत्री कार्यालयातील या फोनमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच फोन आल्याने प्रशासक देखील टेन्शनमध्ये आले. त्यांनी जेव्हा या फोनची खातरजमा केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून अथवा त्यांच्या पीएकडून असा कोणत्याही फोन करण्यात आला नसल्याने समोर आले. त्यामुळे तो फोन करून त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या आर्थिक अडचणीत असल्याने बँकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकांवर सातत्याने विविध कामांसाठी राजकीय नेत्यांच्या फोनचा दबाव असतो. विविध निरोप येत असल्याने प्रशासन देखील याबाबत सावध आहे.
गुरुवारी सकाळी प्रशासकांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे कानडे म्हणून सांगितले. तसेच तो मुख्ममंत्र्यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्यासाठी निरोप आहे. 'त्या' अधिकाऱ्याला तातडीने सेवेत रुजू करून घ्या, असा निरोप फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने प्रशासकांना दिला. फोन करणाऱ्याने वादग्रस्त कामकाज केल्याने सध्या चौकशी सुरू असलेले माजी कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांचे नाव सुचविले. त्यामुळे प्रशासक प्रतापराव चव्हाण यांनी याबाबत सहकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर थेट मुख्यमंत्री कार्यालयात दूरध्वनी करून खातर जमा केली. यावेळी असा फोन कोणीही केला नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
फोन करणाऱ्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी प्रशासकांना आलेल्या फोनवर क्रमांकावर परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो क्रमांक स्वीच ऑफ असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी आता संबंधित फोन टॅपिंगवर ठेवला असून तो त्याचा शोध घेतल्या जात आहे.
नाशिक जिल्हा बँक गेल्या पाच ते सहा वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध घातले आहेत. कामकाज सुधारावे म्हणून नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेने प्रशासक म्हणून चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत बँकेच्या आर्थिक कामकाजाच्या चौकशीत माजी कार्यकारी संचालक पिंगळे यांच्या विषयी तक्रारी आढळल्या त्यामुळे सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.
बँकेने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा भडगा उगारला आहे. यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांना लक्ष करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई देखील सुरू आहे. त्यामुळे बँकेच्या प्रशासकांवर सातत्याने राजकीय नेत्यांकडून दबाव टाकला जाण्याचे प्रकार घडत असतात. दरम्यान, याबाबत प्रशासक चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते आजारी असल्याने भेटू शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तोतया फोनचे प्रकरण पोलिसांच्या तपासावर ठरणार आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.