

Nashik Crime : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस असल्याचा बनाव रचून एका तोतया पोलिसाने खोटे आयडी कार्ड, खोटा गणवेश आणि पोलीस ठाण्यातील AI जनरेटेड फोटो दाखवून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं व त्यांची आर्थिक लूट केल्याचे समोर आले आहे.
सिन्रर तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेसोबत त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख केली. त्याने स्वतःला पोलिस असल्याचे भासवून संबंधित महिलेवर आपली छाप पाडत तीचा विश्वास संपादन केला. तिला लग्नाचे आमिष दाखवले. कधी घरगुती अडचणींचे कारण तर कधी पोलिस ट्रेनिंगचा बहाणा सांगून त्याने या महिलेकडून तीन लाख रुपये उकळले. महिलेने अधिक पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने आपले खरे रुप दाखवले व महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
या तोतया पोलिसाला वावी पोलिसांनी अटक केली आहे. आसीफ कौसर तडवी असे त्याचे नाव आहे. तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथील रहिवासी आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच वावी पोलिसांनी अत्यंत शिताफिने त्याला अटक केली. महिलेला भेटण्यासाठी त्याला सिन्ररला बोलावलं तिथेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी त्याला अटक केली त्यावेळी त्याने पोलिसांचा वेश परिधान केला होता. त्याच्याकडून बनावट पोलिस ओळखपत्र, पोलिस टोपी, अधिकाऱ्यांसारखे शूज, पोलिस चिन्ह असलेला टी-शर्ट व पॅन्ट जप्त करण्यात आले. त्याची बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. (Nashik Crime)
पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात त्याने अनेक महिलांसोबतचे चॅटिंग केल्याचे स्क्रीनशॉट व अश्लील व्हिडीओ आढळले. यावरुन त्याने केवळ याच महिलेचे नाही तर अनेक ठिकाणच्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढून फसवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हा संशयित याआधी देखील २०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस असल्याची बतावणी करून ट्रॅक्टर अडवून पैसे उकळताना आढळून आला होता. त्यामुळे त्याने अशाप्रकारे आणखी किती जणांना फसवलं आहे, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.