
Nashik News, 22 Dec : मावळत्या सरकारमध्ये नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) होते. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षात बरीच ओढाताण झाली होती. मात्र, त्यात भाजपला माघार घ्यावी लागली होती.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आहेत. मात्र, राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्याला संधी मिळालेली नाही. त्यामुळे मंत्रीपद हुकलेल्या भारतीय जनता पक्षाने पालकमंत्रीपद आपल्याकडेच राहावे यासाठी कंबर कसली आहे.
नाशिकचे पालकमंत्री पद भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळाले पाहिजे असा आग्रह जिल्ह्यातील सर्व आमदारांचा आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे, येत्या दोन वर्षात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला राजकीय आणि विकासाचे श्रेय घ्यायचे आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालकमंत्री पद आपल्याकडे राहावे, असा आग्रह या पक्षाचा असेल. मागच्या सरकारमध्ये भाजपचे आमदार जास्त असले तरीही त्यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुक्त हस्त दिला होता.
यावेळी, मात्र भाजप तशी तडजोड करण्याची शक्यता नाही. किंबहुना सध्याच्या सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्ष किती जोर लावणार हा प्रश्नच आहे.
नाशिक महापालिकेवर गेली दोन वर्ष प्रशासकीय राजवट आहे. सत्ताधारी महायुतीने आपली राजकीय सोय म्हणून 2022 मध्ये मुदत संपल्यानंतर महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. अद्यापही हेच प्रशासक कार्यरत आहेत. त्यांच्या काळात झालेल्या अनेक वादग्रस्त कामांमुळे राज्य शासनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
सध्या येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर होतील असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. अशा परिस्थितीत आगामी महापालिका निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अद्याप सावरलेला नाही.
काँग्रेस पक्ष महापालिकेत किती प्रभाव दाखवू शकतो, हा देखील वादाचा विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन शकले झाली आहेत. अशा स्थितीत भाजपला महापालिका निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण जाणवत आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप पूर्ण ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.