

Jalgaon Politics : ज्या ठिकाणी सायकलही पोहचू शकत नाही, त्या ठिकाणी पहाटे अडीच वाजता मंत्री मदतीसाठी पोहचून कार्य सुरू करतांना ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत व्यक्त केले आहे. राज्यातील सत्तासंघर्षातही महाजन हे राजकीयदृष्ट्या संकटमोचक म्हणूनच ओळखले जातात. आता युती सरकारचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन आता महायुती सरकारच्या जनतेचेही संकटमोचक असल्याचे दिसून आले आहे.
भाजप नेते गिरीश महाजन संकट काळात नेहमीच धावून गेले आहेत, अगदी राज्यातील भाजप सरकारवर संकट आले तरीही त्यांना वाचविण्यासाठी ते धावून आले आहेत. या शिवाय जनतेच्या मदतीसाठी वेळोवेळी ते धावून गेल्याचे चित्र दिसून आले आहे. अगदी रस्त्यावर अपघात झाल्यास लोकांच्या मदतीसाठी त्यांनी स्वत:चे वाहन दिले आहे, तर रस्त्यावर ट्रॅफीक जाम झाल्यास ती सुरळीत करण्यसाठी त्यांनी स्वत: ट्रक चालक होवून ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. तर जळगाव जिल्ह्यात बिबट्याचा उच्छाद सुरू असतांना स्वत: पिस्तुल घेवून ते गेले होते. अगदी रहदारी वस्तीत साप निघाला तरी ते धावून स्वत: त्याला पकडतात. असे धाडस ते ‘चमको’गिरीसाठी करतात असे त्यांना विरोधकांनी टोपणेही मारले आहेत, परंतु त्यांनी त्याची कधीच पर्वा केलेली नाही.
भाजप आणि मित्र पक्षाचे युतीच्या सरकारच्या काळातही त्यांनी अनेक प्रसंगी मध्यस्थी केली आहे. नाशिकहून निघालेल्या शेतकरी मोर्चाला तेच सामोरे गेले होते, अगदी मोर्चेकरासोबत ते चालले आणि नेत्यांशी चर्चा करून त्यांनी प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही त्यांनी सरकार व मोर्चेकऱ्यांमध्ये मध्यस्थी केली. तर कृष्णा नदीला आलेल्या पुरात स्वत: पोहोत जावून त्यांनी काही जणांना बाहेर काढले होते. त्यामुळे त्यावेळी त्यांना सरकारचे ‘संकटमोचक’असेही म्हटले जात होते.
महायुतीचे सरकार आल्यानंतरही त्यांना ग्रामविकास मंत्रीपद मिळाले आहे, यावेळी ते जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत. समृध्दी महामार्गावर झालेल्या बस अपघाताची माहीती मिळताच सर्वप्रथम पोहोचलेले मंत्री तेच होते, तर धुळ्या जवळ महामार्गावर झालेल्या ट्रक अपघाताची माहिती मिळताच तातडीने ते तेथे पोहोचले व त्यांनी जखमीसाठी मदतही सुरू केली होती. आता ही इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री अडीच वाजता सर्व प्रथम घटनास्थळी पोहोचून मदत कार्यासाठी ते पोहोचले होते. ज्या ठिकाणीही जाणेही कठीण आहे, ज्या ठिकाणी सायकलही जात नाही, त्या ठिकाणी मध्यरात्री ते पायी जावून मदतीसाठी पोहोचले होते.
गिरीश महाजन यांनी राज्य सरकारच नव्हे केंद्रांतील भाजप सरकारच्या मदतीसाठी धावून गेले होते, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप सरकारविरूध्द आंदोलनाची घोषणा केल्यावर त्यांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडविला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते विश्वासातले मंत्री असल्याचे सांगितले जाते. आता तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही विश्वासातील झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या इर्शाळवाडीतील मदतीच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे युती व महायुती सरकारचे संकटमोचक असलेले महाजन आता जनतेसाठीही खऱ्या अर्थाने ‘संकटमोचक’ असल्याचे म्हटले जात आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.