

Nashik News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शनिवार (दि. २५) भव्य शुभारंभ झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जलयात्रेचा प्रवास असा राहील-
२५ एप्रिल: त्र्यंबकेश्वर ते संगमनेर (मुक्काम: संगमनेर).
२६ एप्रिल: संगमनेरमार्गे शिर्डी (मुक्काम: शिर्डी).
२७ एप्रिल: कोपरगाव, वैजापूर, संभाजीनगर, घृष्णेश्वर (मुक्काम: घृष्णेश्वर).
२८ एप्रिल: कन्नड, चाळीसगाव, धुळे (मुक्काम: धुळे).
२९ एप्रिल: धुळे ते महेश्वर, मध्य प्रदेश (समारोप).
अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वेदात नदीचे महात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुतीसुक्तात ऋषींमुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाचे संवर्धन आणि विकास याचा समन्वय देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच अहिल्यादेवींच्या विचाराच्या आधारे भविष्यातील विकासाची दिशा दाखविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशासाठी महत्वाची असल्याने ती बारमाही प्रवाहित राहावी यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले..
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी घाट, बारव यांची निर्मिती करतांना अध्यात्मिकता आणि उपयुक्तता याचा समन्वय साधला. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी निर्माण केलेले बारव आजही सुस्थितीत असून त्याचे संवर्धन राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार आजही महत्वाचे आणि मार्गदर्शक असून छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांच्या आधारेच शाश्वत विकास साधता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.