

Gulabrao Patil Sings 'Vithu Mauli Tu Mauli Jagachi' : आषाढी एकादशीचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विठ्ठलभक्तीचा अनोखा आविष्कार घडवून आणला.
राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या प्रचंड व्यापातही मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली गायनाची आवड जपली आहे. आपल्या आक्रमक आणि धडाडीच्या राजकीय भाषणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुलाबरावांनी विठू माऊली तू माऊली जगाची… हे विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेले गीत आपल्या स्वतःच्या आवाजात गायले असून, त्याला भक्तिमय संगीताची जोड देण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर हे गीत विठ्ठल भक्तांसाठी खास भेट ठरत आहे.
वारकरी संप्रदायात अत्यंत लोकप्रिय असलेल्या या गीतातून विठ्ठल भक्तीचा भाव व्यक्त करण्यात आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाजातील या सादरीकरणामुळे गीताला वेगळे स्वरूप लाभले असून, त्यांच्या समर्थकांसह वारकरी आणि संगीतप्रेमींकडूनही त्याचे स्वागत होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे गीत त्यांनी युट्यूबवर प्रदर्शित केलं आहे. सोशल मीडियावर हे गीत चर्चेचा विषय ठरले आहे.
राजकीय व्यासपीठावर प्रभावी वक्ता म्हणून ओळख असलेल्या गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीही सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. मात्र, स्वतःच्या आवाजात संपूर्ण भक्तीगीत सादर करण्याचा हा त्यांचा वेगळा प्रयत्न मानला जात आहे.
सध्या हे भक्तीगीत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. आषाढी वारी आणि विठ्ठल भक्तीचे वातावरण असताना गुलाबराव पाटील यांच्या आवाजातील 'विठू माऊली तू माऊली जगाची' हे गीत भाविकांसाठी भक्तिरसाचा नवा अनुभव ठरत आहे.
नेहमी विरोधकांवर आपल्या गावरान आणि रोखठोक शैलीत शब्दांचे बाण चालवणारे गुलाबराव पाटील हे विठ्ठल भक्तीत लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुलाबरावांच्या आवाजातील सहजता, स्पष्ट उच्चार आणि भावपूर्ण सादरीकरण विशेष लक्ष वेधून घेत आहे.
जळगावचे पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटील गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या स्वखर्चातून हजारो वारकऱ्यांना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी विशेष रेल्वेने पाठविण्याचा उपक्रम राबवत आले आहेत. यंदाही ही परंपरा कायम राखत त्यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकऱ्यांना विशेष रेल्वेद्वारे पंढरपूर येथे शनिवारी रवाना केलं. गुलाबरावांनी स्वतः दिंडीत सहभागी होत वारकऱ्यांसमवेत टाळ वाजवत अभंगांचा गजर केला. कोणताही राजकीय बडेजाव न ठेवता अगदी सामान्य वारकऱ्यांमध्ये मिसळून त्यांनी वारीचा आनंद घेतला.
गुलाबराव पाटील यांच्या आवाजात कृत्रिमतेपेक्षा नैसर्गिकपणा अधिक जाणवतो. गीतातील प्रत्येक ओळ त्यांनी भक्तिभावाने गायल्याने विठ्ठलभक्तीचा भाव अधिक प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचतो. त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच आवाजातही एक वेगळी खोली आणि स्थिरता जाणवते, ज्यामुळे हे गीत अधिक श्रवणीय बनले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.