

Sindhudurg Murder Case : कुख्यात गँगस्टर रवी बिडलान हत्या प्रकरणाचा उलगडा आरोपींच्या दारू पार्टीत झालेल्या चर्चेमुळे झाल्याची घटना ताजी असतानाच, आता असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईतील एका बारमध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने आपण पाच वर्षांपूर्वी एकाची हत्या केल्याची फुशारकी मारली आणि त्याच एका वाक्यामुळे तब्बल पाच वर्षांपासून दडलेले हत्याकांड उघडकीस आले.
या प्रकरणाचा तपास करत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सहा जणांना ताब्यात घेतले असून, मालमत्तेच्या व्यवहारातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांचे पथक सिंधुदुर्गात दाखल झाले असून, संशयितांना आज कणकवली न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात घाटकोपर पोलिसांनी आतिष भगवान मोरे (40), सुरेंद्र चंद्रकांत सोनवडेकर (40), मनोज नारायण भंडगे, ऋतुराज शेट्टी, अमित राऊत आणि मनोज भंडारी या सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
मृत तरुणाची ओळख अशपाक उर्फ निहाल राजवल्ली मुलानी (25, रा. तशेदवाडी, माळशिरस, जि. सोलापूर) अशी झाली आहे. अशपाक एका खासगी बँकेत (Bank) कार्यरत होता. कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे काम त्याच्याकडे होते आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग हा त्याचा कार्यक्षेत्राचा भाग होता. याशिवाय तो मित्रांसोबत प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहारही करत होता.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि सिंधुदुर्ग परिसरात प्रॉपर्टी व्यवहार करणारे सुरेंद्र सोनवडेकर, मनोज भंडगे, आतिष मोरे, ऋतुराज शेट्टी, अमित राऊत आणि मनोज भंडारी हे नोव्हेंबर 2021 मध्ये मालवणमधील जमीन व्यवहारासाठी सिंधुदुर्गात आले होते. या व्यवहारासाठी त्यांनी अशपाक मुलानी यालाही बोलावले होते.
4 डिसेंबर 2021 रोजी कुडाळ येथील हॉटेल ओमकारमध्ये मालमत्ता व्यवहारावरून अशपाक आणि त्याच्या मित्रांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रुपांतर थेट हत्येत झाले. संतापलेल्या सहा जणांनी अशपाकचा खून करून त्याच रात्री फोंडाघाटातील दाजीपूर खिंडीजवळील खोल दरीत मृतदेह फेकून दिला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याची दुचाकी देखील दरीत ढकलण्यात आली.
घटनेनंतर जवळपास तीन आठवड्यांनी, 28 डिसेंबर 2021 रोजी स्थानिकांना फोंडाघाटातील दरीत एक मृतदेह दिसून आला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यावेळी कणकवली पोलिस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणाला नाट्यमय वळण चार दिवसांपूर्वी मिळाले. संशयितांपैकी काही जण मुंबईतील एका बारमध्ये दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यातील एकाने आम्ही पाच वर्षांपूर्वी एकाचा खून केला होता, अशी बढाई मारली. ही माहिती घाटकोपर पोलिसांपर्यंत पोहोचताच संबंधिताला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची माहिती दिली. त्यानंतर या हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर पाच जणांनाही अटक करण्यात आली. चौकशीत संपूर्ण घटनाक्रम उघड झाला असल्याची माहिती घाटकोपर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आत्माजी सावंत यांनी दिली. पाच वर्षांपासून अपघाती मृत्यू म्हणून बंद फाईलमध्ये गेलेले प्रकरण, एका बारमधील दारूच्या नशेत मारलेल्या फुशारकीमुळे पुन्हा उघडले गेले आणि अखेर एका थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.\
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.