

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी निवडणुकीच्या खर्चाची कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे. एका उमेदवाराला २ लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे प्रत्येक उमेदवारास बंधनकारक करण्यात आले आहे. राखीव जागेसाठी ५०० तर इतरांसाठी २००० रुपये अनामत रक्कम आहे.
निवडणुकीत आतापर्यंत चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत. यात शिवसेनेच्या दोन व भाजपच्या दोन जागेचा समावेश आहे. त्यामुळे आता उर्वरित १७ संचालकपदासाठी ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. अद्याप एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. माघारीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे उमेदवारी माघारीसाठी केवळ ११ दिवस उरले आहेत.
दरम्यान दिवाळीमुळे गुरुवारपासून अर्ज माघारीबाबतच्या हालचाली थंडावल्या आहेत. ११ तारखेला दिवाळी आटोपल्यानंतर १२ नोव्हेंबरपासूनच अर्ज माघारीच्या संदर्भातील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोण माघार घेणार आणि शेवटी किती उमेदवार रिंगणात उरणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार बँकेच्या २१ संचालक पदांसाठी विविध मतदारसंघांची रचना करण्यात आली आहे. यात प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि.का.स. सेवा सहकारी संस्था आणि संयुक्त शेती संस्थांच्या प्रतिनिधींसाठी १५ जागा (प्रत्येक तालुक्यासाठी एक प्रतिनिधी) निश्चित करण्यात आल्या आहेत.
तसेच, महिला प्रवर्गासाठी २, तर अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती/भटक्या जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय, इतर सहकारी संस्था व पणन संस्था प्रवर्गातून १ प्रतिनिधी निवडला जाणार आहे.
मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा बॅंकेवरील वर्चस्वासाठी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जामनेरमध्ये महायुतीचे मंत्री गिरीश महाजन, मुक्ताईनगर मतदारसंघात मंत्री रक्षा खडसे, जळगाव मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील रिंगणात उतरले आहेत. याशिवाय स्थानिक अनेक दिग्गज, आमदार, माजी आमदार व त्यांचे कुटुंबीय जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात नशिब आजमवणार आहेत. महाविकास आघाडीची ताकद कमी असल्याने महायुतीमध्येच चुरस दिसत आहे. सध्य स्थितीत भाजपचे पारडे जड असून मित्र पक्ष असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपच्या युतीसंदर्भातल्या भूमिकेची प्रतीक्षा करत आहेत.
या मतदारसंघाचा बिनविरोध मार्ग मोकळा
पाचोरा मतदारसंघात शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमीत पाटील यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपचे सतीश परशुराम शिंदे यांचा एकमेव अर्ज वैध ठरला आहे.
पारोळ्यात माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी पाटील, एरंडोलमध्ये आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील, तर भुसावळमध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे या चारही उमेदवारांचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.