

Jalgaon DCC Bank Election : जळगावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावाने करण्यात आलेले ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करत मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हरकती नोंदवल्या होत्या. मात्र, विभागीय सहनिबंधकांनी या हरकती फेटाळल्या आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतलेला आक्षेप व हरकत अर्ज जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा नाशिक विभागाचे सहनिबंधक संभाजी निकम यांनी सुनावणीनंतर फेटाळला. त्यामुळे राजकीयदृष्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.तर, या निर्णयामुळे मतदारयादीतील नावांचा मार्ग मोकळा झाल्याने रक्षा खडसे व रोहिणी खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी घोडसगाव, कर्की, कोथळी या तीन विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या नावाचा ठराव केला आहे आणि, सालबर्डी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करण्यात आलेला होता.
या सर्व चारही ठरावावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी हरकत घेतली होती. रक्षा खडसे या संबंधित गावांच्या मूळ रहिवासी नाहीत. त्यांच्याकडे कार्यक्षेत्रात कायदेशीर शेतजमीन नाही. त्या केंद्रात मंत्री असल्याने लाभाच्या पदावर आहेत. त्यांनी एकापेक्षा अधिक सोसायट्यांचे ठराव घेतले आहेत अशा हरकती होत्या. तर, रोहिणी खडसे या सालबर्डी येथील मूळ रहिवासी नाहीत. त्यांच्या नावे तिथे शेतजमीन नसल्याने त्या पोटनियमांनुसार अपात्र ठरतात, असा दावा करीत त्यांचे नाव वगळण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. खडसे कुटुंबियांच्या ठरावावरील हरकतींबाबत राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष होते.
नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी संभाजी निकम यांनी दोन्ही प्रकरणांत सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर हरकत अर्ज अधिकृतपणे फेटाळत रक्षा खडसे व रोहिणी खडसे यांची नावे मतदारयादीत कायम ठेवण्यात आली. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात खडसे कुटुंबियांची पुढची रणनिती काय याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.