Dilip Wagh : भाजपच्या माजी आमदाराने जुना घोटाळा उकरुन काढला, शिंदेंच्या विद्यमान आमदाराला म्हटले सांगा गप्प का?
Jalgaon politics : मागच्या महिन्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आपण दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शासन दरबारी लावून धरली. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर आपल्या पाठपुराव्याला यश आले व राज्यातील सरसकट मदत जाहीर झालेल्या तालुक्यांच्या यादीत दोन्ही तालुक्याचा समावेश झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला आहे.
मात्र, भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी दोनवर्षांपूर्वीच्या शेतकरी अनुदान घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार पाटील यांना आता लक्ष्य केले आहे. याच मुद्द्यावर आजी-माजी आमदारांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. पाचोरा तालुक्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पाचोरा महसूल विभागाच्या अव्वल कारकून याने दलाल हाताशी धरुन शेतकऱ्यांचे अनुदान लाटले. याप्रकरणात आमदार किशोर पाटील यांची चुप्पी का आहे? असा सवाल माजी आमदार वाघ यांनी उपस्थित केला.
या रॅकेटमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा तर सहभाग नाही ना? म्हणूनच आ. किशोर पाटील यांनी मौन साधलं आहे का? अशी शंका उपस्थितीत करत आमदार वाघ यांनी सवाल केले. हा घोटाळ दोन कोटींपर्यंत मर्यादीत नसून सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. ते महायुतीचे आमदार आहे त्यांनी यावर खुलासा केला पाहीजे. आमदारांच्या गप्प राहण्यामागचे रहस्य समोर यायला हवं असं माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले.
आमदार पाटील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करतात. मग शेतकरी अनुदान लाटल्याच्या या घोटाळ्यावर का बोलत नाही. शेतकऱ्याचं अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकून नाहक त्यांना अडकविण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांचा यात काही संबंध नाही. ज्या एंजटला हे काम सोपवलं होतं तो शिवसेनेचा पदाधिकारी आहे अशी माहिती समोर येत आहे. म्हणून आमदार गप्प आहे का? शेतकऱ्यांपेक्षा आमदारांचे कार्यकर्त्यावर प्रेम आहे का असा सवाल माजी आमदार वाघ यांनी उपस्थित केला.
या घोटाळ्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल झाले असले तरी स्वतंत्र यंत्रणेमार्फत किंवा एसआयटी मार्फत याप्रकरणाची तपासणी झाली पाहीजे. ज्या ज्या लोकांचा यात सहभाग असेल त्यांना शासन झालं पाहीजे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.