

Jalgaon Politics : जळगावच्या पाचोरा येथे रविवारी झालेल्या शिवसेना (शिंदे गटाच्या) निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भर सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याने त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विकास निधीच्या वाटपावरून त्यांनी आपल्याच महायुती सरकारला घरचा आहेर दिला. म्हणाले, महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सहारा आहे असं ते म्हणाले.
किशोर पाटील म्हणाले, चंद्रपूरच्या सभेत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, भाजपमध्ये बंडखोरी केली तर पाच वर्ष हकालपट्टी होईल. मात्र विधानसभेला माझ्या मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली. त्यावेळी त्यांना मी फोन करायचो मात्र ते फोन उचलत नव्हते, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून पदाच्या रूपाने त्यांना तुम्ही शाबासकी देत आहात असे टीकास्र त्यांनी भाजपवर सोडले.
भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही. असं म्हणत भाजवर भर सभेत त्यांनी अविश्वास दाखवला. शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
किशोर पाटील पुढे म्हणाले, मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या सर्व इतर वरिष्ठ नेत्यांची माफी मागितली. की, मी परवानगी न घेता पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात युती होणार नाही, शिवसेना ही स्वतंत्र लढेल अशी घोषणा केली. कारण मला आत्मविश्वास आहे की, मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील जनता माझ्या निर्णयाच्या पाठिशी आहे. येथील जनतेच्या मनात तेवढं स्थान मी निश्चितच निर्माण केलंय असं पाटील म्हणाले.
मी घेतलेला निर्णय योग्य आहे की, नाही मला हात वर करुन सांगा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. यावेळी उपस्थितांनी हात वर केले. त्यावर किशोर पाटील म्हणाले, जर मी घेतलेला निर्णय योग्य असेल आणि तुमची साथ किशोर अप्पा सोबत असेल तर मला इतर कुणाशीही काही देणे-घेणे नाही असं म्हणत त्यांनी युतीचे सगळे दोर कापून टाकले.
मी काही असा तसा सहज हा निर्णय घेतला नाही. गेली १० वर्ष झाली लोकसभा आली की प्रामाणिकपणे यांचे काम करायचो यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करायचो. महाराष्ट्रात लोकसभेला महायुतीची पडझड झाली. पण जळगावात शिवसेनेचे पाच आमदार होते. आमचे संघटन मजबुत होते. महाराष्ट्रात लोकसभेला अनेक ठिकाणी जागा पडल्या पण जळगावात दोन्ही जागा लाखोंच्या मतांनी निवडून आल्या. आमचा सिंहाचा म्हणणार नाही पण आमचा खारीचा तर वाटा होता ना...आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला.. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वत:च राजकीय करिअर दावावर लावलं आम्ही त्यांच्या शब्दाखातर त्यांच्या मागे गेलो.
पण तरीही विधानसभेला माझ्या मतदारसंघात बंडखोरी केली. आदेशाचे पालन केले नाही. बंडखोर उमेदवार उभा केला. बोटावर मोजण्याइतके लोक आपल्या बाजुला ठेऊन आख्खी फौज त्या बंडखोराच्या मागे उभे करायचे असे नालायक धंदे मी गेल्या दहावर्षा पासून पाहतोय असं म्हणत किशोर पाटलांनी भाजपवर टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.