

Jalgaon MLC Election 2005 : स्थानिक प्राधिकार मतदारसंघातील या वेळी होत असलेली निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरत असली तरी गेल्या दोन दशकांत जळगावात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत अनेक रंगतदार किस्से घडलेत. २००५ मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार डॉ. गुरुमुख जगवाणी व पारोळ्याचे तत्कालीन नगराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ए.टी. पाटलांमधील लढत ‘अर्थ’कारणाने गाजली. काही मतदारांनी दोघा उमेदवारांकडून पैसे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर निकालानंतर या दोन्ही उमेदवारांनी संयुक्तपणे ‘वसुली’ मोहीम काढल्याचाही प्रकार घडला.
२००५ मध्ये जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि विरोधकांच्या भूमिकेत भाजप- शिवसेना युती अशी ‘टसल’ होती. त्यातच विधान परिषदेची निवडणूक लागली. त्याआधी सुरेशदादा जैन यांचे समर्थक ॲड. शरद वाणी या जागेवर आमदार होते. भाजपकडून तत्कालीन वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. सुरेशचंद्रसिंह सूर्यवंशी, धडाकेबाज युवानेते कैलास सोनवणे इच्छुक होते. राज्यात सत्तेत असलेल्या आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पारोळ्याचे त्यावेळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष ए. टी. पाटील यांची उमेदवारी पक्की होती. ए. टी. नाना आर्थिकदृष्ट्या ‘तगडे’ उमेदवार होते. त्यांच्या तोडीस तोड उमेदवार भाजपला द्यावा लागणार होता.
..अन् जगवाणी ठरले भाजप पुरस्कृत
कैलास सोनवणेंनी उमेदवारीसाठी नकार दिल्यानंतर भाजपकडून डॉ. सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर झाली. पक्षाने त्यांना अधिकृतपणे ‘ए व बी’ फॉर्मही दिला. तांत्रिकदृष्ट्या डॉ. जगवाणी यांनीही अपक्ष म्हणून ‘डमी’ अपक्ष उमेदवारी दाखल करुन ठेवली होती. निवडणुकीसाठी लागणारा खर्च मोठा होता. राज्यात कॉंग्रेस आघाडीची सत्ता, समोर ए. टी. नानांसारखा ‘तगडा’ उमेदवार म्हणून सूर्यवंशींनी खर्चाच्या कारणास्तव ऐनवेळी माघार घ्यायचे ठरवले. त्यामुळे भाजपचा उमेदवारच मैदानात नाही, अशी स्थिती झाली. शेवटी तत्कालीन भाजपनेते एकनाथ खडसेंनी जगवाणींना राजी करत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून पक्षाची व पर्यायाने युतीची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी केली.
मोठी आर्थिक उलाढाल
त्या सुमारास स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता सत्तेतील कॉंग्रेस आघाडी व विरोधी भाजप- सेना युती हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे निवडणूक कमालीची चुरशीची ठरली. दोन्ही बाजूंनी मोठी आर्थिक उलाढाल झाली. मतदारांना पैसे, अन्य प्रलोभने दाखविण्यात आली. सहलीवरही लाखो रुपये खर्च झाला.
जि.प. अध्यक्ष बंगल्यावरून नियोजन
तेव्हा अशोक कांडेलकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. जि.प. अध्यक्षांच्या स्वातंत्र्य चौकातील निवासस्थानावरून भाजपने या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन केले.. रात्र-रात्र जागून खडसेंसह गिरीश महाजन, कैलास सोनवणे, कांडेलकर व अन्य नेत्यांनी सर्व मतदारांची मोट बांधली. आणि अवघ्या सहा- सात मतांनी जगवाणी विजयी ठरले.
दोन्ही उमेदवारी ‘वसुली’वर
या निवडणुकीत दोघा उमेदवारांकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी रंगली. काही मतदारांनी दोघा उमेदवारांकडून पैसे घेतल्याचे आरोप झाले. या संशयावरून जगवाणी व ए. टी. नानांनी संयुक्तपणे जिल्ह्यात काही ठिकाणी दौरा करत ‘वसुली’ मोहीम राबविल्याचा प्रकारही घडला. अर्थात, त्यातून काही निष्पन्न झाले नाही हा भाग वेगळा..!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.