

Mumabi News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 12 मतदारसंघांमध्ये विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यातही नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीतच बंडखोरी झाल्याने नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर नाशिकमधून भाजपचे बंडखोर गोकुळ गिते आणि जळगावमधून शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
या माघारीनंतरही खबरदारीचा उपाय म्हणून महायुतीच्या नेत्यांनी इथल्या मतदारांना सहलीवर पाठवले आहे. याचे कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक इतिहास. 1972 च्या विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्याचे जाहीर केलेला उमेदवार निवडून आला होता. आता देखील गिते आणि काळे या दोघांचीही नावे मतपत्रिकेवर कायम आहेत. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांनी खबरदारी घेतली आहे.
कोण होते ते उमेदवार?
बाबुराव भारस्कर यांचे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठे नाव होते. मुळचे शेवगाव येथील असलेल्या भारस्कर यांची गांधीवादी विचारांचे राजकारणी म्हणून ओळख होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे यांचे मानसपुत्र मानले जात होते. 1952, 1962 आणि 1967 असे तीनवेळा ते श्रीगोंदा मतदारसंघातून निवडून आले होते. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले होते.
1972 च्या निवडणुकीत काय घडले?
1972 च्या निवडणुकीतही बाबुराव भारस्कर चौथ्यांदा आमदार होण्यासाठी तयार झाले होते. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने भारस्कर यांना डावलून त्यांच्याऐवजी प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या भारस्कर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जामुळे काँग्रेसचा मुख्य उमेदवारच संकटात आला. काँग्रेस हायकमांडने त्यांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांची समजूत काढण्यात आली आणि चर्चेअंती भारस्कर यांनी अर्ज माघार घेण्याची घोषणा केली.
त्याकाळात आताप्रमाणे वाहतुकीची वेगवान माध्यमे उपलब्ध नव्हती. परिणामी भारस्कर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळेत पोहचू शकले नाहीत आणि त्यांचा अर्ज कायम राहिला. आता काय करायचे? यावर श्रीगोंद्यापासून मुंबईपर्यंत बरंच मंथन झालं. अखेर यावर मार्ग काढत भारस्कर यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिंदे यांचा प्रचार करायचा असे ठरले. भारस्कर जाहीर सभांमधून व गावोगावी जाऊन शिंदे हे अधीकृत उमेदवार आहेत, त्यांना मते देण्याचे आवाहन करत होते.
त्या निवडणुकीत शिंदे यांना बैलजोडी तर भारस्कर हे अपक्ष असल्याने त्यांना सायकल हे चिन्ह मिळाले होते. पण भारस्कर यांनी माघारच घेतल्याने शिंदे यांना फारसे आव्हान नव्हते. मात्र मतदारांच्या मनात वेगळेच होते. निकाल लागला तेव्हा निवडणूक रिंगणातून माघार घेतलेल्या भारस्कर यांचा धक्कादायकरित्या विजय झाला होता.
मतमोजणीत अपक्ष बाबुराव भारस्कर यांना १९ हजार ८५३ तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रभाकर शिंदे यांना १५ हजार १९२ मते मिळाली. निवडणूक रिंगणातून माघार घेतलेले पण मतपत्रिकेवर नाव कायम राहिलेले भारस्कर हे ४ हजार ६६१ मतांनी विजयी झाले अन् कोणाच्याही ध्यानी मनी नसताना श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार झाले होते.
त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या नाशिक विधा परिषद मतदारसंघात भाजपचे बंडखोर गोकूळ गिते यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले असले तरी मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम आहे. त्यामुळे कदाचित एक गठ्ठा मते त्यांना मिळूही शकतात. यामुळे नाशिकमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होणार तर नाही ना, याची शंका घेतली जात असल्यानेच या प्रकारामुळे धास्तावलेलेल्या महायुतीच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.