

Jalgaon Politics : जळगाव महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेत बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा देणारे राजकीय नाट्य घडले. उबाठाचे गटनेते इब्राहिम पटेल यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याऐवजी भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव आयुक्तांकडे सादर केले. त्यामुळे गटनेत्यानेच पक्षाचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेच्या कोट्यातील जागा भाजपच्या ताब्यात गेल्याने पटेल यांनी पक्षासोबत गद्दारी केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी बुधवार (दि. २५) रोजी सायंकाळपर्यंत आयुक्तांकडे नावे आणि प्रस्ताव सादर करण्याची मुदत होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून शरद तायडे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते.
मात्र उबाठाचे गटनेते इब्राहिम पटेल यांनी ऐनवेळेला भाजपचे निकटवर्तीय असलेल्या युगंधरा सोळुंके यांचे नाव पुढे केले. सोळुंके यांच्या नावाचा प्रस्ताव त्यांनी आयुक्तांकडे सादर केला. त्यामुळे पटेल यांनी आपल्याच पक्षाचा गेम केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता गटनेते पटेल यांच्यावर पक्षीय पातळीवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या सर्व प्रकारामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी फूट पडल्याचे उघड झाले आहे. तसेच यामुळे महापालिकेत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. तसेच कट्टर विरोधकांशी हात मिळवल्याचा आरोप पटेल यांच्यावर होत आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबलनुसार सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्त होणार आहे. त्यात भाजपच्या वाट्याला ४, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला २ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला एका प्रस्तावाचा अधिकार होता. परंतु भाजपने सुरुवातीपासूनच पाच प्रस्ताव दाखल करण्याची तयारी केली होती. विरोधकांची ताकद कमी करण्यासाठी भाजपाने आखलेल्या रणनीतीला उबाठा गटनेत्याकडूनच बळ देण्यात आलं.
दरम्यान, पटेल यांच्या हालचाली पाहाता शिवसेना उबाठा पक्षाने पाच दिवसांपूर्वीच इब्राहिम पटेल यांना गटनेतेपदावरून हटवून आर्शिन बानो शोएब खाटीक यांची नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पत्र दिले होते. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही न झाल्याने पटेल हे गटनेतेपदावर कायम आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचा प्रस्ताव दाखल करत सोळुंके यांचे नाव पुढे केले.
दरम्यान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वीकृतसाठी महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आयुक्तांकडे गटनेत्याने दिलेला प्रस्ताव मान्य होतो की पक्षाने दिलेला, याकडे जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.