

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित ( Bharat Gavit) यांच्या पॅनलने दमदार विजय मिळवला आहे. त्यांनी स्थानिक राजकारणात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. सरपंचपदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत दीपाली जगदीश गावित यांनी तब्बल १,१०० मतांनी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला.
या निवडणुकीकडे संपूर्ण नंदूरबार जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण या लढतीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आमदार चंद्रकांत रघूवंशी (Chandrakant Raghuvanshi), आमदार शिरीष नाईक (Shirish Naik) माजी आमदार शरद गावित (Sharad Gavit) यांच्यासह भरत गावित यांच्या गटांमध्ये थेट सामना झाला. त्यामुळे ही निवडणूक केवळ ग्रामपंचायतीपुरती मर्यादित न राहता जिल्हास्तरीय राजकीय शक्तीप्रदर्शन करणारी ठरली.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भरत गावित यांच्या पॅनलने आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत ही आघाडी वाढत गेल्याने विरोधकांची आशा क्षीण होत गेली. अखेर दीपाली गावित यांनी १,१०० मतांच्या फरकाने विजय निश्चित करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली. या विजयामुळे खांडबारात गावित गटाचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या ८० जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या असल्या तरी खांडबारा सरपंच निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलणारा हा निकाल मानला जात आहे.
निकाल जाहीर होताच खांडबारात भरत गावित गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाके, ढोल-ताशे आणि मिरवणुकांमधून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गावित गटाला मोठे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.