
Maharashtra politics : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव मतदारसंघात महायुती जवळजवळ फिस्कटल्याचेच चित्र आहे. त्याला कारण म्हणजे शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी जाहिरपणे घेतलेली स्वबळाची भूमिका होय. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण व किशोर पाटील यांच्यात यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
'राज्यात काहीही निर्णय होवो. मी भाजपशी युती करणार नाही. स्वबळावर लढणार' अशी भूमिका आमदार किशोर पाटील यांनी जाहीर केली. मंगेश चव्हाण यांनी आमदार किशोर पाटील यांच्या भूमिकेवर भाजपच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत उत्तर दिलं. किशोर पाटील स्वबळाची भाषा करत असतील, तर भाजपही स्वबळावर लढेल असं मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो त्यामुळे किशोर पाटलांनी टोकाचे बोलू नये. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन घेतील. किशोर पाटील यांचा काही गैरसमज झाला असेल. त्यांच्याशी चर्चेसाठी आमची दारे खुली आहेत. त्यांचा काही प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करून निर्णय घेता येईल, असे आवाहन मंगेश चव्हाण यांनी केलं होतं.
परंतु यावरही मंगेश चव्हाण यांना पुन्हा आमदार किशोर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मंगेशदादा तुमची दारे चर्चेसाठी उघडी असतील, पण आमची मात्र बंद आहेत' असं स्पष्टपणे सांगितलं. अमोल शिंदे यांना दोन्ही विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने दिलेली उमेदवारी, पुरविलेली रसद व युती धर्माशी केलेली गद्दारी यासंदर्भात बोला, असं किशोर पाटील म्हणाले.
किशोर पाटील पुढे म्हणाले, शिवसेनेच्या विभागणीनंतर महायुती सरकार सत्तेवर आल्यावर गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना भाजपचे सर्व उमेदवार, आजी-माजी आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित बसवून जिथे भाजपचा उमेदवार असेल, तिथे शिवसेनेने व जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे, तेथे भाजपने सर्व ताकदीने त्यांना निवडून आणावे, बंडखोरी करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी केली जाईल, असे आदेश दिले होते.
असे असतानाही पाचोरा मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली. त्याला रसद पुरविण्यात आली व निवडणुकीनंतर महत्त्वाची पदे देऊन बक्षीस देण्यात आले. यावर आमदार चव्हाण का बोलत नाहीत? आणखी किती दिवस विषाची परीक्षा घ्यायची? मी विष सहन केले, पण कार्यकर्त्यांची फसगत मला करायची नाही. समोरासमोर लढणे मला आवडते. मग जय किंवा पराजय होईल असे किशोर पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.