Ahmednagar News : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाले असून, यावरून नगरमध्ये राजकीय श्रेयवाद रंगला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार रोहित पवार, भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि माजी आमदार नीलेश लंके यांनी या श्रेयवादात उड्या घेतल्या आहेत.
नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडण्यात आले. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठपुरावा केल्याचा पत्रव्यवहार ट्विट करत श्रेय घेतले. माजी आमदार नीलेश लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे आवर्तन सोडण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे म्हटले आहे. हा राजकीय श्रेयवादाचा विषय चर्चेचा ठरला आहे.
आमदार रोहित पवार यांनी देखील कृष्णा खोरे महामंडळाकडे पाण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे समाज माध्यमांवर पत्रव्यवहार शेअर केला आहे. आमदार पवार यांच्या श्रेयवादावर भाजप (BJP) आमदार प्रा. राम शिंदे यांनी पूर्वीच टीका केलेली आहे. कर्जतच्या विद्यमान आमदाराला पाणी वाटप आणि अन्य प्रत्येक गोष्टीत त्यांचे फोटो व नाव टाकण्याचा हव्यास आहे. त्याला आमचा व प्रशासनाचाही आक्षेप आहे, असे आमदार शिंदे यांनी टीका केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी आमदार नीलेश लंके यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी कुकडी कालवा सल्लागार समिती व घोड प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या बैठकीत उन्हाळी 2024 च्या आवर्तनाकडे लक्ष वेधले होते. शेवटच्या आवर्तनाची आग्रहाची मागणी केली होती. यानंतर आवर्तनासाठी पत्रव्यवहार करत पाठपुरावा सुरू ठेवल्याचे म्हटले.
श्रीगोंद्यातील भीमा नदीपात्रात पाणी आल्यावरून तिथे शरद पवार आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवाद रंगला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली. नागवडे यांनी अजितदादांमुळे पाणी आल्याचा सांगताच, त्यावर शिर्के यांनी खोटे-नाटे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल बंद करावी, असा टोला लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.