

Nashik Kumbmela : कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकासकामांसाठी सरकारकडून हजारो कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे. याला माझा कोणताही आक्षेप नाही परंतु या हजारो कोटींच्या तरतुदींपैकी केवळ 0.1 टक्के निधी सरकारने शाळांसाठी खर्च केला असता, तर राज्यभरात 100 ते 125 मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या नसत्या, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांनी नाराजी व्यक्त केली.
न्यायमूर्ती वराळे धुळे जिल्ह्यातील एका शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याच शाळेत त्यांनी काही काळ शिक्षण घेतले होते. हा कार्यक्रम 'स्मार्ट क्लासेस'च्या लोकार्पणाचा होता. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यातील शिक्षणासाठीच्या घटत्या अर्थसंकल्पीय तरतुदींबाबत तसेच बंद पडणाऱ्या मराठी शाळा, आश्रमशाळांमधील अपुऱ्या सुविधा यावर गंभीर चिंता व्यक्त केली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांवर होणारा प्रचंड सरकारी खर्चाबद्दल बोलताना ते म्हणाले, शासनाकडून कुंभमेळ्यासाठी ३४ हजार कोटी रुपये आणि एका मार्गिकेसाठी ११ हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या घोषणा ऐकल्या.
विकासकामांसाठी निधी खर्च करण्यास आपला कोणताही विरोध नाही. परंतु, या हजारो कोटी रुपयांपैकी केवळ ०.१ टक्के म्हणजे सुमारे ३२ कोटी रुपये शाळांसाठी खर्च केले असते, तर राज्यातील १०० ते १५० मराठी शाळा बंद पडल्या नसत्या.
इतर वेगवेगळ्या उपक्रमांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली जात असतानाही, शिक्षणाशी संबंधित अत्यावश्यक पायाभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अलिकडेच एका निवासी आश्रमशाळेत योग्य सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत होते. दुर्दैवाने, साप चावल्यामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला आणि आणखी एक मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
इतर अनेक आश्रमशाळांची परिस्थिती अशीच असून समाधानकारक नाही. शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढली पाहीजे त्याऐवजी उलट ती कमी होताना दिसत असल्याची खंत न्या. वराळे यांनी व्यक्त केली.
पूर्वी केंद्र स्तरावर शिक्षणासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद पूर्वी 11 टक्क्यांच्या दरम्यान असायची. मात्र, आता वाढती विद्यार्थी संख्या पाहता हे बजेट वाढायला हवे होते. त्याऐवजी, अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी कमी झाला आहे आणि अनेक वर्षांपासून तो 13 टक्क्यांपर्यंतही पोहोचू शकलेला नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
माझेही शिक्षण मराठी शाळेत
वराळे यांनी आपला शैक्षणिक प्रवास सांगितला. ते म्हणाले, माझे संपूर्ण शिक्षण नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. मात्र, त्यामुळे मला कोणतीही अडचण करिअर मध्ये आली नाही. मराठी शाळेने व्यापक, उदारमतवादी दृष्टी दिली. बंधुभाव आणि सामाजिक जाणीव या भाषेनेच शिकवली. त्यामुळे मराठी शाळा बंद पडत असतील, तर ती अत्यंत चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.