Lasalgaon APMC Politics : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती -उपसभापती पदाची निवडणूक दोनदा स्थगित झाली आहे. बाजार समितीचा संत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून संचालक मंडळाच्या दोन गटांत 'संगीत खुर्ची'चा खेळ सुरू आहे.
निवडणुकीच्या राजकीय गोंधळामुळे निवडणूक लांबणीवर पडली असून मंत्री छगन भुजबळांनी एका कार्यक्रमात आपल्या खास मिश्कील शैलीत बाजार समितीच्या संचालक मंडळाची चांगलीच हजेरी घेतली व कानउघडणी केली. साहेब, तुम्ही म्हणाल ते मान्य म्हणणारे आता कुठे गेले असा सवाल भुजबळांनी केला.
बाजार समितीत होळकर व थोरे अशा दोन्ही गटांत सभापती -उपसभापती पदासाठी रस्सीखेच सुरु असून भुजबळांनी दोन्ही गटाच्या संचालकांना खडेबोल सुनावले. 'आत्ताच सगळं का पाहिजे?' असा सवाल करत भुजबळांनी इच्छुकांच्या घाईला एकप्रकारे सबुरीचा सल्ला दिला.
खुर्चीपेक्षा बाजार समिती आणि शेतकऱ्यांचे हित महत्वाचे असल्याचे सांगत भुजबळांनी 'एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' असा मंत्र सांगितला. 'तुम्हाला काय करायचे ते करा, जेवढे भांडायचे तेवढे भांडा; पण शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, एवढे लक्षात ठेवा, अशा इशाराच भुजबळांनी दोन्ही गटाच्या संचालकांना दिला.
दोन्ही गटांत सभापती कुणाला करायचं यावरुन वाद आहे, त्या पार्श्वभूमीवर राजकारणात थांबावे लागते, संधी येत जात राहतात. प्रत्येकाला कधी ना कधी संधी मिळते. आज एक सभापती, उद्या दुसरा, आज एका नावाची पाटी, उद्या दुसऱ्याची यात राजकारण संपत नाही, उलट सहकार्याने काम केले, तर संस्थेची प्रतिष्ठा वाढते.
बाजार समितीच्या गेटवर येणारा शेतकरी कोणत्या गटाचा आहे, हे बघितले जात नाही, तर त्याच्या कांद्याला किती भाव मिळतो, त्याला किती सुविधा मिळतात आणि त्याच्या मालाचे नुकसान होते का, हेच त्याच्यासाठी महत्त्वाचे असते. म्हणूनच सध्या बाजार समितीमधील दोन्ही गटांनी शेतकऱ्यांचाच विचार करायला हवा असा सल्ला भुजबळांनी दिला.
बाजार समितीमध्ये सध्या दोन गट पडले आहे. काल पर्यंत एकमेकांच्या सोबत असलेले नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. दोन वेगवेगळ्या गटांत विभागले आहे. कुणी न्यायालयात तर कुणी पणन मंत्र्यांच्या दरबारात धाव घेतली आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही गटांना भुजबळांनी आरसा दाखवला.
दोन्ही गटाकडून मंत्री भुजबळ यांचा आपापल्या 'आशीर्वाद' असल्याचा दावा केला जात आहे. एका गटाने तर 'साहेब, आम्ही तुमच्याबरोबर आहोत' असा व्हिडिओच शेअर केला. पण निवडणुकीची वेळ आली की, चित्र वेगळेच असते. एक गट न्यायालयात, दुसरा पणन मंत्र्यांकडे. राजकारणात यालाच कदाचित आपले ते आपले आणि वेळ आली की, आपापले, असे म्हणावे लागेल, असा टोला लगावत भुजबळांनी ही मोठी गंमत असल्याचं म्हटलं.
यावेळी लासलगाव बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती ललित दरेकर यांच्यासह संचालक जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, सुवर्णा जगताप, सोनिया होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, छबूराब जाधव, गणेश डोमाडे, रमेश पालवे, महेश पठारे, भीमराज काळे, बाळासाहेब दराडे यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.