Latur Political News : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. त्यात सत्ताधारी भाजप पक्षाने आपले पदाधिकारी कामाला लावले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारीही जोरदार सुरु आहे. तीच परिस्थिती आता लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात निर्माण झाली आहे.
तेथील भाजप (BJP) चे विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. त्यासाठी तेथील भाजपच्या जुन्या - नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु केली आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचाराचा रेणापूर (Renapur) तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो अनेकांनी त्यांच्या सोबत काम केले आहे.
मधल्या काळात काही कारणाने अनेक जण दुरावले गेले अशा सर्व सहकाऱ्यांना पुन्हा भाजपाच्या प्रवाहात घेऊन विधानपरिषदेचे आमदार रमेश कराड पुन्हा नव्या जोमाने विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. रेणापूर मतदारसंघातून दिवंगत गोपीनाथ मुंडे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत रेणापूर तालुका लातूर (Latur) ग्रामीण मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.
2009 व 2014 च्या विधानसभेला रमेश कराड यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली. परंतु माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या प्रभावामुळे दोन वेळा निसटता पराभव झाला पण राज्यात सत्ता परीवर्तण होऊन भाजपाचे सरकार आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे खेचुन आणली. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला, संघटन वाढवत कराड यांनी 2019 ची जोरदार तयारी केली.
पण जिल्हा परिषद निवडणुकीत व रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत दिवंगत मुंडे यांच्यासोबत पक्षात काम केलेल्या काही जेष्ठ कार्यकर्त्यांत व कराड यांच्यात उमेदवारीवरुन बिनसले, तर तालुकाध्यक्ष पदाचा वादही बराच गाजला. पण मतदारांनी भाजपाला भरभरुण मतदान केले. यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय झाला.
कराड यावेळेस आमदार होणार असे चित्र निर्माण झाले होते. परंतु पक्षाने मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले. पक्षाने रमेश कराड यांना 13 फेब्रुवारी 2020 रोजी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष केले. त्यानंतर 14 मे 2020 रोजी विधानपरिषदेवर आमदार म्हणुन पक्षाने त्यांना संधी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर जिल्हाध्यक्ष व आमदारकीच्या माध्यमातून लातूर ग्रामीण मतदारसंघात विकासकामासाठी निधी देत कार्यकर्त्यांना बळ देत संघटन बांधणीवर भर दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असून कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन दुरावलेल्या सहकाऱ्यांना भाजपाच्या प्रवाहात घेत लातूर ग्रामीण मधून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन तेच वातावरण विधानसभेला ठेवण्यासाठी कराड जोमाने कामाला लागले आहेत.
मतदारसंघात मांजरा, विकास व रेणा हे तीन सहकारी आणि 21 शुगर मळवटी (ता. लातूर) हा खासगी साखर कारखाना देशमुख परिवाराच्या ताब्यात आहेत. याचा फटका बसत आसल्यामुळे रामेश्वर (ता. लातूर ) येथे संत गोपाळबुवा महाराज शुगर ॲंन्ड ॲग्रो फुड प्रा. लि. या कारखान्याची उभारणी सुरु केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ऊस गाळपासाठी जत नसल्याची अडचण दूर झाली.
रमेश कराड यांचा मोठा मुलगा ऋषिकेश कराड त्यांची कांही दिवसापुर्वी युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी निवड झाली आहे. त्यांच्या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांची मजबुत बांधणी होण्यास मदत होणार आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.