राजेंद्र त्रिमुखे
Nagar News : सोयीचे राजकारण करून इतर पक्षातल्या राजकारण्यांच्या दावणीला असलेले आणि एकदा नव्हे; तर अनेकदा पक्षांतर करणारे गद्दार नको, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले खुद्दार हवेत, अशी भूमिका माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेश आणि शिर्डी लोकसभा उमेदवारीबाबत ठाकरे गटाच्या उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी घेतल्याचे पुढे येत आहे. (Local leaders of the Thackeray group opposed Bhausaheb Wakchaure entry)
संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (ता. १८ ऑगस्ट) उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, शिर्डी आदी तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. यात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करत शिवसेना खासदारकीचा उमेदवार निवडून आणेल. मात्र, उमेदवार गद्दार नको, अशी भूमिका भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाबत मांडत ही भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
बैठकीमध्ये शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, मुजीब शेख तसेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिर्डी लोकसभा अनुषंगाने आपली मते व्यक्त केली. एकीकडे मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. शिर्डीबाबत भाऊसाहेब वाकचौरे यांचा २३ ऑगस्ट रोजी पक्षप्रवेश देत त्यांची उमेदवारी घोषित होणार असल्याचे बोलले जाते. या चर्चेला स्वतः भाऊसाहेब वाकचौरे यांनी माध्यमांसमोर येत दुजोरा दिलेला आहे.
एकूणच वाकचौरे यांचा शिवसेना पक्षप्रवेश आणि संभाव्य उमेदवारीला पक्षात स्थानिक पातळीवर तीव्र विरोध असल्याचे दिसून येत आहेत. माजी मंत्री बबनराव घोलप यांनीही उमेदवारीसाठी मोठी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आमचे या मतदारसंघात दोन आमदार असून पक्ष संघटन मजबूत असल्याने जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे, असा आग्रह धरलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिर्डी लोकसभेसाठी जागा कुणाकडे जाणार आणि उमेदवारी कुणाला मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.