Jalgaon News : खासदार रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांना रावेर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली. मात्र, अद्यापही भाजप आणि खडसे कुटुंबातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना डिवचलं आहे.
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक झाली. या बैठकीला उमेदवार स्मिता वाघ आणि खासदार रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांसह विविध वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. नेत्यांनी राजकीय भाष्यदेखील केले. तेव्हा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या पोटात असलेले ओठावर आलेच. त्यामुळे ही बैठक चर्चेचा विषय ठरली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री महाजन ( Girish Mahajan ) यांनी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले. "खडसे आणि माझा छत्तीसचा आकडा आहे. आमच्यातील राजकीय वाद नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामुळे माझा त्यांना विरोधदेखील होता. मात्र, पक्षाने विचारणा केल्यावर मी तो विरोध सोडून दिला. उमेदवारी देण्याची शिफारस केली. आता उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आपण सगळे एक दिलाने काम करू. खासदारांना निवडून आणू. खासदारांनीदेखील निवडून आल्यावर कार्यकर्त्यांना विसरू नये. कार्यकर्त्यांची कामे करावीत," असा सल्ला महाजनांनी रक्षा खडसेंना दिला.
या वेळी महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनाही टीकेचे लक्ष्य केले. "अद्यापही खडसे भाजपवर टीका करतात. त्यांनी अशी टीका करताना विचारपूर्वक करावी. खडसे हे काँग्रेसमधून आले होते. खडसे हरिभाऊ जावळे यांच्या बॅगा उचलत होते. भाजपमध्ये आल्यावर पक्षानं त्यांना आमदार केले. दहा-दहा खात्यांचे मंत्री केले. प्रतिष्ठा दिली. तरीही ते भाजपवर टीका करतात. यापुढे हे सहन केले जाणार नाही. त्याला चोख उत्तर देऊ," असा इशारा महाजनांनी दिला.
या वेळी भाजपचे महामंत्री रवी अनासपुरे, जळगाव जिल्ह्याचे प्रभारी विजय चौधरी, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.