Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांची कार्यकर्ते देखील प्रचारासाठी आक्रमक झाले आहेत. यातून काही ठिकाणी वाद उफाळतो आहे. नगर तालुक्यातील नागरदेवळेच्या अलमगीर भागात दोन गटात मारामारी झाली. यावर माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले चांगलेच आक्रमक झाले आहेत.
"मुस्लिम समाजाला मस्ती आली असेल तर, आम्ही कायदा हातात घेऊ. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर शहर दौरा असल्याने आम्ही शांततेची भूमिका घेत आहोत. याशिवाय भाजप उमेदवाराच्या समोर असलेल्या विरोधी उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात अशा घटनांना खतपाणी घालताना दिसतो आहे", असा गंभीर आरोप माजी आमदार कर्डिले यांनी केला.
नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील अमलगीर येथे काल रात्री वाद झाले. जुन्या भांडणाच्या कारणावरून पुष्कर शेलार याच्यावर सात ते आठ युवकाच्या गटाने हल्ला केला. हल्लेखोरांना हल्ला करताना तलवार, कोयता, लोखंडी राॅड आणि लाठ्या-काठ्यांचा वापर केला. यात पुष्कर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती अजूनही अस्थिर आहे.
जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवकावर हल्ला झाल्यानंतर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. याशिवाय भाजप युवा मोर्चाचे अक्षय कर्डिले यांनी देखील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. तसेच हिंदूराष्ट्रसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील रुग्णालयात गर्दी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आणि यातच ही घटना झाल्याने पोलिसांनी नागरदेवळे गावासह नगर शहरात बंदोबस्त वाढवला होता. जिल्हा रुग्णालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, पोलिसांनी तिथेही बंदोबस्त दिला होता. माजी शिवाजी कर्डिले यांनी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात येत पुष्कर शेलार आणि त्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत हल्लेखोर मुस्लिम समाजाच्या गटावर निशाणा साधत पोलीस प्रशासनाला देखील इशारा दिला.
शिवाजी कर्डिले म्हणाले, "पुष्कर शेलार हा किराणा घेत होता. त्याच्याशी मुस्लिम समाजातील काही युवकांशी जुना वाद होता. सहा ते आठ मुस्लिम गटाच्या हल्लेखोरांनी पुष्करवर हल्ला केला. हल्लेखोरांनी तलवारी आणि लोखंडी राॅडचा वापर केला. पुष्करची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. परंतु मुस्लिम समाजाला मस्ती आली असेल, तर आता भूमिका घेऊ. कायदा हातात घेऊ. मागे एकमेकांचे वाद झाले होते. ते मिटवले गेले होते. शांततेचे आवाहन केले. तरी देखील आठ-दहा लोक एकत्र येऊन एकट्या हिंदू लोकांना मारत असेल, तर हिंदू लोक आता गप्प बसण्याचे कारण नाही".
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला येत आहेत. त्यामुळे आम्ही शांततेची भूमिका घेत आहे. असे असले, तरी पोलिसांनी या घटनेत कायदेशीर कारवाई करावी. कलम लावावी. ते लावली नाही आणि हल्लेखोरांना अटक करण्याची कारवाई केली नाही, तर मग त्याचा उद्रेक नगर जिल्ह्यात होईल. त्याचा परिणाम पोलीस प्रशासनाला देखील भोगावा लागेल. त्यामुळे हल्लेखोरांना तत्काळ अटक करा. यानंतर देखील आमच्या शेपटावर पाय दिल्यास, आम्ही देखील आक्रमक भूमिका घेणार, असा इशारा शिवाजी कर्डिले यांनी दिला.
या घटनेबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक यांच्याशी बोललो आहे, असे शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. नगरमध्ये निवडणुकीच्या काळात अशा घटना वाढल्या आहेत. यावर शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता टार्गेट केले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचा उमेदवार उभा आहे. या निवडणुकीच्या काळात समोरच्या उमेदवाराकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणिवपूर्वक, अशा घटनांना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप देखील शिवाजी कर्डिले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.