राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे सोमवारी दिंडोरी मतदारसंघाच्या बैठकीत सहभागी झाले. शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'तुतारी' फुंकली. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये कोण कुठे याचा गोंधळ होता. त्यामुळे उमेदवार कोण असेल इथपासून निवडणुकीची तयारी देखील ठप्प झाली होती. मात्र, कालपासून मविआच्या बैठकांना सुरुवात झाल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) चांगले नेटवर्क आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर कोणता नेता कुठे, याबाबत मोठा गोंधळ होता. हे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी सुरू झाली आहे.
काल (26 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत कादवा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे (Shriram Shete) यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत भाग घेतला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी महाविकास आघाडी भक्कम करण्याचे आवाहन केले.ॉ
कांदा निर्यातबंदी, द्राक्षांचे गडगडलेले भाव, शेतीमालाच्या समस्या आदींमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या नाराजीचा लाभ घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे. तसे झाल्यास हमखास विजय मिळेल, असा दावा शेटे यांनी केला.
श्रीराम शेटे हे दिंडोरी तालुक्यातील प्रभावी नेते असून त्यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) या दोन्ही नेत्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे शेटे नेमके कोणत्या गटाचे हा संभ्रम असल्याने कार्यकर्ते देखील द्विधा मनस्थितीत होते. आता आता शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकली आहे. त्यामुळे राजकीय चित्र स्पष्ट झाल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या (Dindori Loksabha Constituency) निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्षाने विविध प्रश्नांवर गोंधळ निर्माण करून समाजा समाजात तेढ निर्माण केले आहे. विरोधी पक्षांचे नेते अमिष दाखवून फोडले. राजकीय पक्षांत बंडखोरी घडवून आणली. त्यामुळे सामान्य जनतेत भाजप विषयी प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला (BJP) त्याची झळ बसेल. असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी यावेळी सांगितले.
सोमवारी पेठ, दिंडोरी आणि सुरगाणा या तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. आज कळवण, देवळा आणि चांदवड या तालुक्यांची बैठक होईल. उद्या (28 फेब्रुवारी) येवला, लासलगाव, निफाड आणि मनमाड येथे बैठका होणार आहेत.
या बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय पाटील, कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, प्रवीण जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, काँग्रेसचे प्रकाश पिंगळ, वाळू पाटील, भास्कर भगरे, पांडुरंग गणोरे, सतीश देशमुख, आदिवासी संघटनेचे कैलास शार्दुल यांसह विविध संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.