
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी व उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी विद्यमान सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे सक्षमीकरण आणि दोन नवीन प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेवरुन महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. परिणामी, गोदावरी स्वच्छतेसाठी प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प वादात सापडला असून चर्चेत आला आहे.
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, उमा खापरे, डॉ. परिणय फुके, सदाशिव खोत व चित्रा वाघ यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरी नसतानाही निविदा प्रक्रिया राबविल्याची कबुली दिली. शिवाय महापालिकेकडूनदेखील या संदर्भातील अहवाल प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले.
नाशिकमध्ये 31 ऑक्टोबर 2026 रोजीपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. त्यादृीने गोदावरीसह उपनद्या प्रदूषणमुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे सक्षमीकरण व दोन नवीन प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. प्रारंभी महापालिकेने निविदा प्रक्रियेत नागपूरच्या काही विशिष्ट ठेकेदारांना लक्षात घेऊन अटी व शर्ती घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास कांदे व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार विभागाने महापालिकेकडून अहवाल मागवला. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने सुमारे ५० पानी वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर केला असून त्यात काही नकारात्मक शेरे नोंदविले. त्यानंतर शासनाने थेट अध्यादेश काढून प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या आदेशानुसार ७० टक्के निधी शासनाकडून, तर उर्वरित ३० टक्के महापालिकेकडून दिला जाणार आहे. दरम्यान, भाजपच्या सहा आमदारांनी या प्रकल्पासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, या निविदा प्रक्रियेस ना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची, ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे. निविदा प्रक्रियेला मंजुरी नसल्याचे लेखी उत्तर शिंदेंनी दिले.
विशेष म्हणजे, हा प्रकल्प भाजपकडून पुढे आणण्यात आला असून, भाजपच्याच आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांनी थेट आणि स्पष्ट उत्तर देऊन संपूर्ण चर्चेचा सूरच पालटल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. महापालिकेने 50 पानी वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला असल्याचे यापूर्वी जाहीर झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लेखी उत्तरात राज्य शासनाला असा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच तेराशे कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्याच्या जीवन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता निविदा प्रसिद्ध केली का, या प्रश्नावर शिंदे यांनी होकारार्थी उत्तर दिले. यामुळे युतीतील मतभेद अधिक ठळक झाले असून, भविष्यात तांत्रिक अडथळे निर्माण होऊन संपूर्ण प्रकल्प अडचणीत सापडू शकतो, अशी शक्यता लक्षात घेता शिंदेंनी भाजप आमदारांना अशा प्रकारे सडतोड उत्तरे दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.