
Maharashtra politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात भाजपसह महायुतीच्या अन्य दोन्ही पक्षांनी मोठी इनकमिंग मोहीम सुरु केली आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र हा तर महायुतीचा बालेकिल्ला आहे. तो आणखी अधिक मजबुत करण्यासाठी महायुतीकडून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षातील चांगले चेहरे हेरुन त्यांना आपल्या पक्षात सामील करुन घेतलं जात आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीची ही मोहीम चांगलीच तेजीत असून महाविकास आघाडीला हद्दपार करण्याचा जणू चंगच महायुतीने बांधला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील चारही महापालिका भाजपने ताब्यात घेण्याचा निर्धार केला आहे. नाशिक महापालिकेत तर शंभर प्लसचा नारा भाजपने दिला आहे. कोणत्याही परिस्थिती भाजपला आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सत्ता हवी आहे. त्यामुळे हे ध्येय गाठण्यासाठी भाजप विरोधी पक्षातील मोठ मोठे मासे आपल्या गळाला लावत आहे. विशेष करुन महाविकास आघाडीमधील ज्या नेत्यांकडे चांगली आर्थिक ताकद आहे, स्वत:चा जनाधार आहे. स्वतः सह इतरांना निवडून आणण्याची क्षमता आहे अशा नेत्यांना अग्रक्रमाने गळाला लावले जात आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ज्या सुधाकर बडगुजर यांचा भाजपच्या सीमा हिरे यांनी पराभव केला. ज्या सुधाकर बडगुजर यांचा सर्वांधिक संघर्ष भाजपबरोबर झाला. ज्या सुधाकर बडगुजर यांच्यावर भाजपने देशद्रोहाचे आरोप केले. त्याच बडगुजर यांना सीमा हिरे यांचा व इतर स्थानिक नगरसेवकांचा विरोध डावलून भाजप श्रेष्ठींनी पक्षात घेतलं. नाशिक महापालिकेचा गड राखण्यासाठीच तर भाजपने आपल्या पक्षातील स्थानिक आमदारांची नाराजी अंगावर घेतली.
नाशिकमध्ये शिवसेनाही यात काही मागे राहिली नाही, शिवसेनेने एक एक मासा गळाला लावून उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णता खिळखिळा केला आहे. नाशिकमध्ये विलास शिंदे यांचा नुकताच शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांच्यासोबत अनेक नेते व माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. आता बोटावर मोजण्याइतकेही माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षात राहिलेले नाहीत. सर्वांधिक शिंदे गटात दाखल झाले आहेत.
धुळ्यात जे पाटील घराणं ७० वर्षांपासून कॉंग्रेस सोबत एकनिष्ठ राहिलं तेच भाजपने फोडलं. कुणाल पाटील यांना तर भाजपचे आमदार राम भदाणे यांनीच पराभूत केलं आहे. बडगुजर यांना पक्षात घेतांना ज्या चुका झाल्या त्या टाळून भाजप श्रेष्ठींनी कुणाल पाटील यांना पक्षात घेण्याची योजना आखली. आमदार राम भदाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मुंबईत आपल्या त्रिकुट बंगल्यावर बैठक घेऊन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्यांची समजूत काढली. कुणाल पाटील यांना पक्षात घेण्यासाठी सर्वांना तयार केलं.
जळगावातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील तसेच चोपड्याचे माजी आमदार कैलास गोरख पाटील यांना अजित पवार यांनी गळाला लावलं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ भाजपमध्ये गेले. तर माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही शरद पवार यांच्या पक्षाचे नेते गळाला लावून अजित पवार यांनी आपली ताकद वाढवली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणातील प्रसिद्ध असलेल्या हिरे घराण्यातील माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही कमळ हाती घेतलं आहे. नाशिकच्या पश्चिम मतदारसंघात त्याचं वलय आहे. ते बघून भाजपने त्यांना गळाला लावलं आहे.विधानसभेला बंडखोरी केलेल्या गणेश गिते यांना भाजपने नुकतच पुन्हा पक्षात घेतलं आहे. भाजपसोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेही पक्ष या स्पर्धेत आघाडीवर आहेत. विरोधी पक्षातील नेते गळाला लावण्याची ही मोहीम इतकी जोरात सुरु आहे की ती पाहाता विरोधी पक्षात कुणी शिल्लकच ठेवायचे नाही असा चंगच महायुतीने बांधल्याचे दिसते आहे.
(Edited by Ganesh Sonawane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.