Deepak Bhosale News: बांगलादेशी नागरिकांचा विषय घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने आरोप करत असतात. मात्र मालेगाव प्रकरणात ते अडचणीत येण्याची चिन्हे आहे. यासंदर्भात सोमय्या यांना थेट आव्हान देण्यात आले आहे.
भाजपनेते किरीट सोमय्या यांनी प्रशासनावर दबाव आणून मालेगाव शहरात 4 हजार जन्मदाखले रद्द केले होते. जन्म दाखले रद्द झालेले सर्वजण बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत असा आरोप केला होता. हा आरोप त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.
आज मालेगाव महापालिकेची महासभा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. माजी नगराध्यक्ष दीपक भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फलक घेत पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त आणि किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले.
सोमय्या यांच्या रेट्यानंतर जे जन्म दाखले रद्द झाले त्यात सध्याचे नगरसेवक आणि पहिले हिंदू नगराध्यक्ष दीपक भोसले यांचाही समावेश आहे. त्यांचे वडील श्रीराम वेडू भोसले आणि काका लक्ष्मण बेडू भोसले हे प्रत्येकी 10 वर्ष नगरसेवक होते. त्यांच्या कुटुंबातील राजेंद्र लक्ष्मण भोसले हे देखील 10 वर्ष नगरसेवक होते.
हे भोसले कुटुंबीय स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मानतात. त्यांच्या पत्नी ज्योती दीपक भोसले याही मालेगाव शहराच्या 20 वर्ष नगरसेविका होत्या. त्यांचे सबंध कुंटुंब हिंदू व सक्रीय राजकारणात आहे. मात्र सोमय्यांच्या कारवायांमुळे दीपक भोसले यांचाच जन्म दाखला रद्द झाला आहे.
या प्रकरणात आयुक्त रवींद्र जाधव यांनी भाजपच्या सोमय्या यांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे हे प्रकरण घडले आहे. आयुक्त जाधव यांनी सोमय्या यांना नेमकी काय माहिती दिली हे कळावे म्हणून त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी भोसले यांनी केली.
भाजपचे सोमय्या यांनी आपल्याला बांगलादेशी, रोहिंग्या आणि अतिरेकी या शब्दांत हिणवले आहे. आम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार मानतो. मात्र या भोसले घराण्यालाच सोमय्या यांनी बांगलादेशी ठरविले आहे. त्यामुळे मला जगणे मुश्किल झाले आहे. या आरोपांमुळे आमची प्रचंड मानसिक आणि चरित्राची हानी झाली आहे. समाजात वावरणे मुश्किल झाले आहे, असे भोसले म्हणाले.
या प्रकरणात भोसले यांनी महापालिका आयुक्त यांची नार्को टेस्ट करावी. किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे भोसले कुटुंबाची माफी मागावी. तसे न झाल्यास आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करावे लागेल, असा इशारा भोसले यांनी दिला.
किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी आणि जन्म दाखल्यांचे प्रकरण लावून धरले आहे. यामध्ये अनेक प्रतिष्ठित व हिंदू कुटुंबीयांना त्याची झळ बसली आहे. मुस्लिमांविरुद्ध हाती घेतलेल्या या मोहिमेचे झळ अनेक हिंदू कुटुंबीयांना बसली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या प्रकरण भोसले यांच्या आंदोलनाने कोणते वळण घेते याची उत्सुकता लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.