Chalisgaon News : सध्या राज्यात खुर्चीवरून सुरू असलेले राजकारण उच्चकोटीला पोहोचले आहे. अनेक मातबरांनी पक्षांतर करून आपला वारसा चालविण्यासाठी धडपड चालू केली आहे. आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबातील बायका-मुलांना कसे तिकीट मिळेल, यासाठी जोरदार प्रयत्न सर्वत्र सुरू आहेत. अनेकांनी तर आपली मुले, भावाची मुले, मुली, भाचे यांना राजकारणात पुढे करून वारसा चालवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात मोजकेच नेते सोडले तर त्यांच्या कुटुंबात राजकीय वारसा पुढे आला नाही. हा राज्याच्या राजकारणातला इतिहास आहे.
आमदारकीचे तिकीट मिळाल्यानंतर पहिल्याच प्रचार सभेत आपल्या कुटुंबात कोणीच यापुढे निवडणुकीला उभे राहणार नाही, अशी जाहीरपणे भूमिका मांडणारे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी पुन्हा त्याचा पुनर्विचार करत बायको व मुलासाठी कधीच टिकीट मागणार नाही व त्यांना निवडणुकीत उतरवणार नाही, असा धाडसी निर्णय जाहीर करून टाकला आहे. कदाचित असे सांगणारे राज्यातील ते पहिले राजकारणी असतील.
पक्षाने अल्पावधीत जे दिले त्यावर समाधानी आहे. जरी पक्षाने उद्या पक्षाच्या कार्यासाठी सूचना दिल्या तरी पक्षासाठी समर्पण भावाने काम करेल. पण बायको, मुलांसाठी कधीच तिकीट मागणार नाही किंवा त्यांना निवडणुकीत उभे करणार नाही, असे ठामपणे मंगेश चव्हाण यांनी संकटमोचन गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत सांगून टाकले आहे.
चाळीसगावला आरटीओ प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते व जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्या प्रसंगी त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्येच हा निर्णय पुनश्च: जाहीर करून टाकला आहे.
पहिल्यांदाच आमदार झालेले चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात एखाद्या मंत्र्याच्या मतदारसंघातील कामाप्रमाणे कामांचा धडाका लावलेला आहे. राज्यात त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्याबाबतीत देखील चार-पाच दिवसांत शासन निर्णय काढून कार्यालय तातडीने सुरू करण्यात त्यांनी नवीन पायंडा पडला आहे. तालुक्यात अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्ह्याच्या राजकारणात मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असून, कमी कालावधीत त्यांनी जिल्ह्यांच्या महत्त्वाच्या संस्थांवर आपले विश्वासू सहकारी यांची नियुक्ती करून वेगळी छाप निर्माण केली आहे. मग जिल्हा बँक असो की जिल्हा दूध संघ असो, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशीदेखील पंगा घेणारे म्हणून त्यांनी जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे सर्व पक्षात त्यांचे सौख्य असून, गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनीदेखील सदर कार्यक्रमात त्यांचे तोंड भरून कौतुक केले.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.