Chhagan Bhujbal News: ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माजी मंत्री भुजबळ हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत.
माजी मंत्री छगन भुजबळ यंदा पाचव्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सलग वीस वर्ष ते मंत्री होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा कोटा भुजबळ हेच पूर्ण करीत होते. त्यामुळे अन्य आमदारांना संधी मिळाली नव्हती.
यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नाशिक जिल्ह्यातून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना स्थान दिले आहे. त्यामुळे भुजबळ नाराज होते. या संदर्भात भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मंत्री कोकाटे यांनी जशास तसे उत्तर दिले होते.
मंत्री कोकाटे यांनी आता मात्र पक्षाने भुजबळ या विषयावर बोलू नये, असे सुचित केल्याचे सांगितले. माजी मंत्री भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे. मी ते उत्तर देऊ शकतो. मात्र माझ्या दृष्टीने छगन भुजबळ हा विषय संपला, या शब्दात कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्री कोकाटे यांच्या या सूचक विधानाने आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या दृष्टीने छगन भुजबळ या विषयावर फारशी चर्चा होणार नाही, असे दिसते. माजी मंत्री भुजबळ यांच्याबाबत त्यांच्या सहकारी विरोधकांनी आरोप केल्यासते चर्चेत येतात. या प्रत्येक आरोपाला छगन भुजबळ उत्तर देतात. त्यामुळे भुजबळ यांच्याकडे लक्ष केंद्रित होते. असा आजवरचा अनुभव आहे.
मध्यंतरी माजी मंत्री भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय दबाव निर्माण केला होता. त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री पवार यांना टिकीचे लक्ष्य केले होते. दुसरीकडे त्यांची भारतीय जनता पक्षाशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती.
त्याचा त्यांना चर्चेत राहण्यासाठी फायदा झाला. मात्र यातून त्यांच्या पदरात मंत्रिपद अद्यापही पडलेले नाही. आगामी काळात भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का? हा विषय आता पडद्यामागे जाण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री कोकाटे यांनी यासंदर्भात केलेल्या विधानाने माजी मंत्री भुजबळ यांची स्वतःच्या पक्षाकडूनच उपेक्षा होते की काय? अशी स्थिती आहे.
राजकारणात अनेकदा एखाद्याकडे दुर्लक्ष करून त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्येष्ठ नेते असूनही भुजबळ यांच्याबाबत हेच धोरण तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून राबविले जात नाही ना? अशी चर्चा निमित्ताने सुरू आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.