
Ahilyanagar News: मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी लाखो मराठा बांधवांसह पाच दिवस मुंबई जाम केली होती. अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं मराठा आरक्षणाबाबत सुवर्णमध्य काढत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यात विखे पाटलांनी मोठा पुढाकार घेतला होता. पण त्यांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठा दावा केला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी (ता.6) सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी वाढवल्याखेरीज मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रश्न सुटणार नाही.
थोरात म्हणाले, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या या शासन निर्णयात आपणास नवे काही दिसलेले नाही. पण आरक्षण मिळाल्याच्या थाटात मराठा आंदोलकांनी गुलाल उधळला असला, तरी यातून हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. यात नवे काहीही नसताना आंदोलकांनी हा निर्णय स्वीकारणे, त्यावर जल्लोष करणे ही आंदोलकांची भूमिका आपल्याला कळतच नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या मराठा आरक्षणाबाबत घेतलेला शासन निर्णय पुढे टिकला नसल्याचा दाखलाही यावेळी दिला. त्याचमुळे आपल्याला गॅझेटवर आधारित दिलेल्या आरक्षणाबाबत काळजी वाटत असल्याचंही थोरात यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ मराठाविषयक उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय जाहीर करत त्याबाबतचा शासन निर्णयही जारी केला.
बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जीआरविषयी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत गुलाल उधळला होता, त्याचे काय झाले? असा सवाल करतानाच आता, मुंबईत गुलाल उधळून पुढे काय होणार, याविषयीचं शंका उपस्थित केली आहे.
थोरात म्हणाले, मुंबईत एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलक जमा केले. त्यांनी सलग आंदोलन केलं. पण त्यांना यानंतर मूळ मागण्यांचाच विसर पडल्यासारखं भलत्याच निर्णयावर आरक्षण मिळाल्याचा सध्या सर्वत्र जल्लोष सुरू असल्याची टीका केली आहे.
तसेच मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याऐवजी राज्यातील आरक्षणाची टक्केवारी वाढवत या समाजाला कायमस्वरूपी टिकणारे स्वतंत्र आरक्षण देणेच योग्य असून, त्या शिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी वाढवल्याखेरीज मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रश्न सुटणार नाही, असा दावाही बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
याचदरम्यान, सरकारच्या जीआरवर आक्षेप घेणार्यांना मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, जीआरबाबत काहीजण जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. त्यामुळे नेमके काय काम सुरू आहे हे लोकांना कळल्यानंतर अफवा पसरविणाऱ्यांचा संभ्रम दूर होईल. तसेच संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांच्याशी चर्चा करेन, माझे दरवाजे त्यासाठी खुले आहेत. असे असले तरी मागणीनुसार जीआरमध्ये बदल करू, असेही विखे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.