प्रदीप पेंढारे :
Ahmednagar News: मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाची राज्यभर आंदोलनाची तीव्रता आता वाढू लागली आहे. राज्यकर्त्यांना मराठा समाजाकडून आता टार्गेट केले जावू लागले आहे. संगमनेर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेले नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना देखील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
संगमनेरमध्ये देखील बसस्थानकाबाहेर मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे रविवारी गेले होते. आंदोलनाच्या व्यासपीठावर मंत्री विखे चढताच त्यांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
तेवढ्यात विखे पाटील परत जा...परत जा.., अशा घोषणा काहींनी सुरू केल्या. एक मराठा लाख मराठा.., अशीही घोषणाबाजी सुरू झाली. मंत्री विखे यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना बाजूला घेतले. तरी देखील तरुण जोरदार घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले.
मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू झाले आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने आंदोलनात उडी घेतल्यापासून त्याची तीव्रता वाढू लागली आहे.
याची झळ आता राज्यातील मंत्री, मराठा आमदारांना बसू लागली आहे. त्यांचे कार्यक्रम रोखले जात आहेत. मंत्री विखे हे आंदोलनस्थळी गेल्यावर तिथे काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक भवनाग मथुरे, उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आपली आणि सरकारची भूमिका त्यांनी आंदोलकांसमोर मांडली. मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.