प्रदीप पेंढारे-
Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी, तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पाथर्डीतील दहा तरुणांनी सामूहिक गळफासाचा प्रयत्न बुधवारी केला. पाथर्डी पोलिस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाजाच्या या तरुणांची समजूत घातल्यानंतर हे तरुण झाडावरून खाली उतरले.
राज्यात मराठा आरक्षणाचा वणवा पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसांपासून बेमुदत उपोषण आंदोलन करत आहे. आज रात्रीपासून त्यांनी पाणी त्याग केले आहे. परंतु त्यांच्या आंदोलनावर आणि मराठा समाजाविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अवमानकारक वक्तव्य केले.
त्यामुळे पाथर्डीतील मोहोज देवढे येथील तरुणांनी मंत्री राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याशिवाय मराठा आंदोलकांवर ठिकठिकाणी दाखल गुन्हे रद्द करावेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून, त्यांनी मराठा आरक्षणाविषयी केलेल्या मागण्या तत्काळ पूर्ण करून त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी तरुणांनी केली.
या मागणीसाठी आदिनाथ देवढे, संजय देवढे, प्रकाश काटे, सचिन काटे, गणेश देवढे, नामदेव देवढे, युवराज यादव, योगेश देवढे, सचिन देवढे, अनंता देवढे या दहा तरुणांनी आंदोलनस्थळी असलेल्या झाडावर चढत सामूहिकपणे गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती काहींनी पोलिसांना दिली. लगेच पाथर्डी पोलिसांनी गावात धाव घेतली. पोलीस चर्चेचा प्रयत्न करत असताना नारायण राणे, रामदास कदम, गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सहायक निरीक्षक योगेश राजगुरू आंदोलकांची समजूत घालत होते. सहायक निरीक्षक राजगुरू यांनी आंदोलकांचे प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर यांच्याशी बोलणे करून दिले. कार्यवाहीचे आश्वासनानंतर आंदोलक झाडावरून खाली उतरले. यानंतर सर्वांचीच सुटकेचा निश्वास सोडला. मराठा आरक्षणासाठी मोहोज देवढे ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. याशिवाय साखळी उपोषण सुरू आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.