Nashik, 4 May : नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा १५ वर्षांनंतर वेगळे राजकारण घडताना दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रमुख पक्ष दुय्यम भूमिकेत आहेत. मुख्य लढत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटात होत आहे. यात मतांचे ध्रुवीकरण होण्याऐवजी सामाजिक सलोख्याचे पर्व दिसून येत आहे.
गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये (Nashik Lok Sabha Constituency ) मुख्य लढत शिवसेना-भाजप युतीचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि काँग्रेस आघाडीचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात होत आली आहे. या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवार पक्ष आणि पक्षाचे चिन्ह घेऊन लढतो. राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक मात्र शेवटच्या टप्प्यात जातीच्या राजकारणाकडे निवडणूक घेऊन जात आले आहेत. त्यामुळे नाशिकची निवडणूक सातत्याने राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे असा सरळ सामना होता. हे सर्व सामाजिक संदर्भ आणि राजकारण मोडीत काढून नवे सामाजिक समीकरण घडविण्यात पहिल्यांदा कारणीभूत ठरले ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नाशिक मतदारसंघातून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची होती. त्यासाठी प्रचंड ओढाताण झाली. मात्र, एकमत न झाल्याने अखेर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. परिणामी नाशिकमध्ये महायुतीचे खासदार गोडसे यांची लढत महाविकास आघाडीच्या माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याशी होत आहे. तिसरे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर हे देखील याच पारंपारिक बहुजन समाजाच्या जडणघडणीतील आहेत. त्यामुळे मुख्य लढत मराठा विरुद्ध मराठा अशी दिसते आहे. यामध्ये ओबीसी अर्थात प्रामुख्याने वंजारी समाज 'की फॅक्टर' म्हणून भूमिका पार पाडताना दिसतो आहे.
उमेदवार निश्चितीतील ही राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता यंदाची निवडणूक अतिशय रंजक होणार, हे स्पष्ट आहे. एरवी निवडणुकीमध्ये सिन्नर अर्थात नाशिकचा विचार करताना मराठा आणि वंजारी हे दोन प्रमुख समाज दोन वेगळ्या वाटेने जाताना दिसतात. प्रत्येक निवडणुकीत हे दोन्ही समाज परस्परांच्या विरोधात राजकीय खेळी करीत असतात. त्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होत आला आहे. यंदाची निवडणूक मात्र अनपेक्षितपणे त्याला अपवाद ठरली आहे.
माजी आमदार वाजे हे सिन्नरचे आहेत. त्यांची प्रतिमा सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारे अशी आहे. त्यामुळे सातत्याने त्यांना मराठा आणि वंजारी या दोन्ही समाजांचा पाठिंबा मिळत आला आहे. लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल या दोन्ही समाजाच्या बंधूभावातून वेगळ्याच लागणार, हे स्पष्ट आहे. हे दोन्ही समाज पहिल्यांदाच हातात हात घालून एकाच उमेदवारासाठी तन मन धनाने झटत आहेत. हे नाशिकच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य.
सिन्नर विधानसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत वाजे यांच्यासाठी पहिल्यांदा संबंध मतदार संघात हे दोन्ही समाज एकत्र आले होते. २०२९ च्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली. मधल्या काळात २०१७ मध्ये सिन्नरच्या शीतल सांगळे यांना वाजे यांनी जिल्ह्यातील अनेकांचा विरोध असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. शीतल सांगळे ह्या प्रतीक होत्या. खऱ्या अर्थाने ही नियुक्ती समाजाला प्रतिनिधित्व म्हणून देण्यात आली होती.
शीतल सांगळे यांच्या नियुक्तीमुळे एक नवा सामाजिक एकोपा मराठा आणि वंजारी समाजात निर्माण होण्यास वाजे कारणीभूत ठरले होते. तेव्हापासून हे चित्र अद्याप कायम आहे. यंदा काही नेत्यांनी त्यात बाधा आणण्याचा प्रयत्न केला. अद्यापही सिन्नरचे काही नेते निवडणुकीत तटस्थच आहेत. मात्र, समाजाने एकमुखाने आणि एकत्र राहून वाजे यांना उघड पाठिंबा दिला आहे. त्याचे पडसाद संबंध जिल्ह्याच्या राजकारणावर आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.