मालेगाव : पिस्तुल घेऊन एक बुरखाधारी व्यापाऱ्याच्या घरात शिरतो. त्याचा हेतू दरोडा (Robbery) टाकण्याचा होता. मात्र महिलांच्या (womens) प्रसंगावधानाने तो अयशस्वी होतो. त्यानंतर सुमारे तासभर त्याला पकडण्याचे नाट्य घडले. यावेळी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना माहिती मिळाल्यावर ते स्वतः घटनास्थळी गेले. त्याची समजूत घालून पोलिसांच्या (Police) स्वाधीन होण्यासाठी त्याचे मन वळवित राहिले. ऐन दिवाळीत हे नाट्य घडले. (Minister Dada Bhuse reached on the spot of robbery)
येथील कलेक्टरपट्टा भागातील जैन स्थानकाजवळील मितेश विनोद दोशी (वय ५५) यांच्या बंगल्यात घुसून ४० वर्षीय दरोडेखोराने नकली पिस्तुलचा धाक दाखवत सोने व पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुजनाचा सण असल्याने घरात फक्त तीन महिलाच होत्या.
त्याने महिलांच्या हातावर चावा घेत डोक्यावर मारले. या घटनेचे वृत्त शहरात पसरताच बंगल्याभोवती मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पालकमंत्री दादा भुसे तातडीने घटनास्थळी पोहोचले. महिलांना वेठीस धरणाऱ्या भामट्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. घरातील महिलांच्या समय सुचकतेने मोठा अनर्थ टळला.
शहरातील महावीर ऑटो स्पेअरपार्टसचे व्यावसायिक मितेश दोशी जैनस्थानकाजवळ राहतात. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कृष्णा अण्णा पवार (वय ४०, रा. विद्यानगर, जोगेश्वरी कॉलनी, सोयगाव, मालेगाव) हा भामटा चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरात शिरला. दोशी यांच्या पत्नी भावना, मुली हिमांशी व खुशबू अशा तिघीच घरात होत्या. भामट्याने पिस्तुलाचा धाक दाखवत महिलांना घाबरविले. हिमांशी यांच्या हाताला चावा घेतला. तर भावना यांच्या डोक्यावर मारहाण केली. या प्रकारानंतर महिलांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक धावून आले.
घरात दरोडेखोर घुसल्याची चर्चा पसरल्याने नागरिकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांना फोनवर माहिती दिली. तसेच, मितेश दोशी यांनाही कळविण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार जवानांसह दाखल झाले. नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले. त्याचवेळी कृष्णा हा दोशी यांच्या स्लॅबवर जाऊन बसला होता.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे तातडीने कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कृष्णाला बाहेर येण्यास सांगितले. श्री. भुसे यांनी सांगितल्यानंतर कृष्णाने बाल्कनीचा दरवाजा उघडला. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे खेळण्याचे पिस्तुल सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकारामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली होती. छावणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.