अरविंद जाधव
Nashik News : राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले. मोदी यांच्या हस्ते काळारामाची पूजा करण्यात आली. अखंड भारताचे निर्माण आणि पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प त्यांनी काळाराम मंदिरात केल्याचे मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितले. (Modi's resolution for Akhand Bharat at Kalaram Temple)
स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधानपदावरील व्यक्तीने रामकुंडावर जाऊन गोदापुजन केले. काळाराम मंदिराचे दर्शनसुद्धा ऐतिहासिक ठरले आहे. काळाराम मंदिरात पंतप्रधान तब्बल २३ मिनिटे उपस्थित होते. या वेळी मोदी यांच्या हस्ते पूजा करताना संकल्प करण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काळाराम मंदिरात पुजा करणारे महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखंड भारताचे निर्माण होऊ दे, अशी विनंती रामरायाकडे केली. नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान होतील आणि ते पुन्हा काळारामाच्या दर्शनाला येतील, असा महत्त्वाचा संकल्प पुजेवेळी करण्यात आला.
पंतप्रधान मोदी पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी परिश्रम घेत आहेत. त्यांची ही मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी रामरायाकडे मागणे मागण्यात आल्याचे सुधीर महाराज यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीचे गंगापूजन केले. रामतीर्थ येथे दर्शन घेत विधिवत पूजा व आरती केली.
गोदाकाठी गंगा पुरोहित संघाच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चांदीचा अमृत कलश, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल, दिलीप शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतिक शुक्ल, वैभव दिक्षित, चंद्रशेखर गायधनी, शेखर शुक्ल, अतुल गायधनी, अमित पंचभैये, वैभव बेळे, भालचंद्र शौचे, उपेंद्र देव आदीसह पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. गोदापुजन करण्यासाठी मोदी रामकुंडावर पोचले, त्यावेळी गोदाकाठावर मोठा जनसमुदाय जमला होता.
Edited : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.