

Mula Cooperative Sugar Factory Election 2026: ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्थापन केलेल्या आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील नेवासा येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गडाख गटाने पुन्हा एकदा आपला मजबूत दबदबा सिद्ध केला आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 74 उमेदवारी अर्जांपैकी तब्बल 49 उमेदवारांनी गुरुवारी अर्ज माघारी घेतल्याने 21 जागांसाठी आता फक्त 25 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. त्यामुळे बहुतांश जागांवर गडाख गटाचे उमेदवार जवळपास बिनविरोध निवडून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, ‘मुळा’ची निवडणूक लढवणारच असा जोरदार एल्गार करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे आणि उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या विरोधी पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. विरोधी गटाकडून अखेर केवळ तीनच उमेदवार निवडणूक मैदानात कायम राहिले आहेत.
विरोधी गटाने करजगाव गटातून किरण लक्ष्मण जाधव आणि नारायण दत्तात्रेय डौले, तर महिला राखीव गटातून मीराबाई भाऊसाहेब दिवटे यांना मैदानात ठेवले आहे. याशिवाय करजगाव गटातील अपक्ष उमेदवार गोरक्षनाथ मोहन जाधव यांनीही अर्ज कायम ठेवल्याने आता निवडणुकीत (Election) मर्यादित पण थेट लढत होणार आहे.
दरम्यान, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटातील 18 उमेदवार जवळपास बिनविरोध निवडून आल्यात जमा असून आता अवघ्या 3 जागांसाठी शुक्रवार, 26 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी अर्ज मागे घेतलेल्या 49 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.
सोनई गट: वसंत कुसळकर, छाया भुसारी, दिनकर घावटे. घोडेगाव गट : लक्ष्मण पांढरे, एकनाथ जगताप, दत्तात्रेय बऱ्हाटे. खरवंडी गट : बापूसाहेब शेटे, भाऊसाहेब मोटे, सोपान विरकर. करजगाव गट : डॉ. ज्ञानेश्वर दरंदले, चंद्रकांत टेमक. नेवासे गट : बाळासाहेब भणगे, त्रिंबक सुकाळकर.
प्रवरासंगम गट: बाळासाहेब पाटील, पांडुरंग निपुंगे. शंकरराव गडाख (उत्पादक सहकारी), शंकर कदम (अनुसूचित जाती-जमाती), कमल चांगदेव दहिफळे, विमल नारायण सोनवणे (महिला राखीव), भाऊसाहेब भालके (इतर मागासवर्गीय), बाळासाहेब परदेशी (विमुक्त जाती-जमाती).
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचा जोरदार एल्गार फुसका ठरताना दिसत असून, गडाख गटाने पुन्हा एकदा कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. आता लक्ष लागले आहे ते 26 जून रोजी होणाऱ्या निर्णायक मतदानाकडे!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.