Nashik News : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कांदा निर्यात बंदी केली. या कालावधीत नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात आली. ही कांदा खरेदी विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. नाफेडचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार सिंग आणि हिशेब अधिकारी हिमांशू यांच्या बदल्या करण्यात आल्या. सिंग यांचा पदभार अतिरिक्त कार्यकारी संचालक कामना शर्मा यांना देण्यात आला आहे. नाफेडच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ही कारवाई झाली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान कांदा निर्यात बंदी आणि भाजपचे (Bjp) धोरण यावर विरोधी पक्षांकडून टीका होत होती. या कालावधीत भाजपशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संस्थांनी कांदा खरेदीत भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले होते. या आरोपांचा फटका लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला बसला. (Onion Politics News)
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar ) या पराभूत झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे विजयी झाले. त्यामागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधील असंतोष हे प्रमुख कारण होते.
या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्य तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. 'नाफेड'चे अध्यक्ष जेठा अहिर यांनी नुकतेच नाशिकच्या नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रांना भेटी देऊन माहिती घेतली होती. त्यानंतर केंद्रीय पथक गेले चार दिवस नाशिक चांदवड लासलगाव सह कांदा खरेदी केंद्रांना भेट देत माहिती घेत होते.
या कालावधीत शेतकऱ्यांनी कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराचे पुरावे या पदाधिकाऱ्यांपुढे मांडले. कांदा खरेदीतील व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव होता. हिशेब व्यवस्थित नव्हते. त्यामध्ये घोटाळा असल्याचा संशय आहे. असा ठपका बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आल्याचे कळते. कांदा खरेदी केंद्राचा निर्णय घेताना निविदा प्रक्रियेत ठराविक लोकांना प्राधान्य देण्यात आले.
विशेष म्हणजे कांदा खरेदीसाठी निवडलेल्या सर्व दहा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी थेट संबंध होता, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला यानिमित्ताने दुजोरा मिळाल्याचे बोलले जाते.
आता पुढील चौकशीत कांदा खरेदीत काय आणि कितींचा घोटाळा झाला हे उघडकीस येते की नाही याची उत्सुकता आहे. कांद्या खरेदीतील घोटाळ्यात थेट राजकीय नेते आणि पक्षांचा संबंध जोडला जाऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.