

Nashik Bird Election Results 2026: नाशिक शहराचा मानचिन्ह पक्षी निवडण्यासाठी घेण्यात आलेल्या अनोख्या मतदानात गिधाडाने कावळ्यावर 958 मतांनी विजय मिळवला. मात्र, जवळपास 25 लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये या प्रक्रियेत केवळ 3,032 नागरिकांनी सहभाग घेतल्याने मतदानातील अल्प प्रतिसाद आणि निवड प्रक्रियेच्या सर्वसमावेशकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आजवर लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबद्दल तुम्ही ऐकले असेल. मात्र, नाशिकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका अनोख्या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक राजकीय पक्षांमध्ये नव्हे, तर चक्क पक्ष्यांमध्ये रंगली. नाशिक शहराचा मानचिन्ह पक्षी कोण असावा, यासाठी ही अनोखी निवडणूक झाली. यात कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांमध्ये थेट सामना रंगला होता.
नाशिकमध्ये पार पडलेल्या पक्ष्यांच्या या अनोख्या निवडणुकीत गिधाडाने बाजी मारली आहे. नाशिकचा मानचिन्ह पक्षी म्हणून कोणाची निवड व्हावी, यासाठी कावळा आणि गिधाड यांच्यात थेट लढत झाली होती. या चुरशीच्या सामन्यात गिधाडाने कावळ्याला तब्बल ९५८ मतांनी पराभूत केले. त्यामुळे कावळ्याला मागे टाकत गिधाडाने नाशिकच्या मानचिन्ह पक्ष्याचा मान मिळवला आहे.
गिधाड आणि कावळा अशा पक्षी मानचिन्हासाठी पर्यावरणप्रेमी नाशिककरांच्या वतीने एकूण ३०३२ मतदान झाले होते. गिधाड मानचिन्हासाठी १९९५ मत पडले तर कावळा मानचिन्हासाठी १०३७ मते पडली. त्यात गिधाड पक्ष्याला अधिक मत पडल्याने गिधाड जिंकले.
नाशिकच्या पक्षी मानचिन्ह निवड प्रक्रियेचा निकाल गुरुवारी (दि. १९) महापालिकेत नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. या वेळी निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
मात्र, या निवडणुकीसंदर्भात निसर्गसेवक युवा मंचचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी काही सवाल उपस्थितीत केले आहे.
निसर्ग संवर्धनाचा उद्देश निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि ३,०३२ नागरिकांचा सहभाग आम्ही नाकारत नाही; उलट त्याचे स्वागतच करतो. मात्र, एवढ्या सहभागाला संपूर्ण नाशिककरांचा कौल म्हणता येणार नाही. नाशिकची लोकसंख्या जवळपास २५ लाख असताना हा सहभाग एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ०.१२ टक्के आहे".
"नाशिकचे पक्षी मानचिन्ह निवडण्यासारखी महत्त्वाची प्रक्रिया सर्वसमावेशक, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने होणे अपेक्षित होते. पक्षी अभ्यासक, पर्यावरण क्षेत्रातील संस्था, निसर्गप्रेमी आणि नागरिकांना विश्वासात घेणे, पर्यायी सूचना स्वीकारणे आणि सर्वांना समान संधी देणे आवश्यक होते अशी भावना निसर्गसेवक युवा मंच अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे".
केवळ मतदानाचा आकडा म्हणजे व्यापक लोकसहभाग नव्हे; तर निर्णयप्रक्रियेत किती लोकांना सहभागी करून घेतले, त्यांची मते किती गांभीर्याने विचारात घेतली, हेही महत्त्वाचे आहे. आमचा आक्षेप उपक्रमाच्या उद्देशाला नव्हता, तर प्रक्रियेच्या पारदर्शकतेला आणि सर्वसमावेशकतेला होता. आज विजेता कोणताही पक्षी असो; मात्र या प्रक्रियेत व्यापक लोकशाही संवाद आणि सर्वांचा विश्वास निर्माण करण्याची संधी गमावली, हीच आमची खरी खंत आणि निराशा असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.