Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-Dhikle
Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-DhikleSarkarnama

Nashik BJP MLAs : नाशिकमधील भाजपचे तीन्ही आमदार बेदखल, गिरीश महाजनांचाच एककल्ली कारभार

Girish Mahajan Politics : मंत्री गिरीश महाजन यांनी आता आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध झुगारुन त्यांच्या मतदारसंघात काही नेत्यांचा प्रवेश घडवून आणला. यापूर्वी आमदार राहुल ढिकले व सीमा हिरे यांच्याबाबतीतही सेम घडलं आहे.
Published on

Nashik Politics : राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणजे आमदार तो आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो. स्थानिक पातळीवर पक्षाला काही निर्णय घ्यायचा असल्यास संबधित आमदाराला विश्वासात घेणं महत्वाचं असतं. प्रत्येक निर्णयात आमदाराची भूमिका महत्वाची असते. कारण तो लोकप्रतिनिधी असतो. परंतु नाशिकमध्ये तसे चित्र अजिबात दिसून येत नाही.

नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. पंरतु भाजपचे तीन्ही आमदार प्रत्यक्षात 'बेदखल स्थितीत' आहेत. तीन्ही आमदार हे केवळ नावापुरतेच असल्याचे दिसत असून त्यांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांचाच एककल्ली कारभार सुरु असल्याचं चित्र आहे. भाजप आमदार तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचं दिसत आहे.

मंत्री गिरीश महाजन हे सुरुवातीपासून स्थानिक आमदारांना झुगारुन निर्णय घेत आले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मंत्री महाजन यांनी शंभर प्लसचा नारा दिला. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पक्षात इनकमिंग घडवून आणलं. विरोधी पक्षातील अनेकांना गिरीश महाजनांनी स्थानिक आमदारांचा विरोध डावलून भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यांना पक्षात घेताना मतदारसंघातील संबधित आमदाराला साधी विचारणाही त्यांनी केली नाही.

Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-Dhikle
Devyani Pharande : देवयानी फरांदेंच्या डोळ्यात आलं पाणी, गिरीश महाजनांपुढे झाल्या हतबल..

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसघांचे आमदार राहुल ढिकले यांच्याविरोधात बंडखोरी करुन निवडणूक लढवलेले गणेश गिते यांना पुन्हा भाजपत घेण्यास राहुल ढिकले यांचा विरोध होता. पण मंत्री महाजन यांनी ढिकले यांचा विरोध झुगारुन गणेश गिते यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला. महाजनांच्या आशीर्वादाने ढिकले यांच्या नाकावर टिच्चून गणेश गिते यांचे भाजपमध्ये जोरदार कमबॅक झालं.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे यांचा विरोध असतानाही शिवसेना उबाठाचे सुधाकर बडगुजर यांचा भाजप पक्षप्रवेश मंत्री गिरीश महाजन यांनीच घडवून आणला. बडगुजर यांना पक्षात घेऊ नका हे सांगण्यासाठी सीमा हिरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. पण सीमा हिरे यांचे पक्षश्रेष्ठींनी ऐकलं नाही. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वाजत गाजत बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाला.

Girish-Mahajan-Seema-Hiray-Devyani-Pharande-Rahul-Dhikle
Raj Thackeray setback : भाजपने राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा नेता फोडला, पक्षप्रवेशही झाला ; नाशिकच्या राजकारणात खळबळ

त्यानंतर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याही बाबतीत तसच घडलं आहे. देवयानी फरांदे यांना आता महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन निवडणूक प्रमुख करण्यात आलं आहे. असे असतानाही गिरीश महाजनांपुढे त्या हतबल झाल्याचे दिसून आलं.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, कॉंग्रेसचे शाहू खैरे यांचा भाजप प्रवेश आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध झुगारुन महाजन यांनी घडवून आणला. आपण निवडणूक प्रमुख असतानाही आपल्याला याबाबतीत विचारणा करण्यात आली नाही अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली.

आमदार फरांदे यांच्या समर्थकांनी देखील मंत्री गिरीश महाजन यांना गराडा घातला. हा पक्षप्रवेश थांबवा म्हणून गिरीश महाजन यांना विनंती केली. पण महाजन यांनी आमदार फरांदे यांचा विरोध फाट्यावर मारुन विनायक पांडे, यतीन वाघ, कॉंग्रेसचे शाहू खैरे यांच्यासह मनसेचे दिनकर पाटील या सगळ्यांच्या हातात भाजपचे कमळ सोपवलं. जे झालं ते आपल्याला आवडलं नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना फरांदे यांनी दिली. यावेळी त्या बोलताना त्या महाजनांपुढे किती हतबल झाल्यात ते दिसलं. मनावर दगड ठेऊन त्यांनी या सगळ्यांचं पक्षात स्वागत केलं.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com