

Nashik By Election : नाशिक जिल्ह्यातील ज्या ठिकाणी सदस्यांच्या नामांकनानंतर निधन झाले अशा मनमाड नगरपरिषद तसेच देवळा व पेठ नगरपंचायतीतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने 20 जून 2026 रोजी मतदान होणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात मनमाड नगरपरिषद तसेच देवळा व पेठ नगरपंचायतीतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने नुकतीच आढावा बैठक घेऊन निवडणूक तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा देखील घेतला. बैठकीत मनमाड नगरपरिषदेमधील २ पदे, देवळा नगरपंचायतीतील १ पद आणि पेठ नगरपंचायतीतील १ पद अशा एकूण ४ रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
4 रिक्त जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेची तयारी, आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्तांनी संबंधित क्षेत्रांतील संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची स्थिती, त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विशेष उपाययोजना तसेच निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापनाबाबतची माहिती जाणून घेतली.
मतदान केंद्रांवर मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, रॅम्पसह दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला.
यासोबतच प्रत्येक निवडणूक केंद्रातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची संख्या, प्राप्त झालेली नामनिर्देशन पत्रे, निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन, प्रशिक्षण व्यवस्था आणि निवडणूक साहित्याची उपलब्धता याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नगरपरिषद पोटनिवडणूक संदर्भातील आवश्यक तयारीची माहिती दिली. पोलीस आयुक्त (ग्रामीण) डॉ. स्वामी यांनी पोटनिवडणूक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था संदर्भात केलेल्या तयारीची माहिती विषद केली.
जिल्हा परिषदेची निवडणूक कधी?
ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका रखडल्या आहेत. यासंदर्भात आगामी २३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय निकाल येतो, यावरच पुढील निर्णय अवलंबून असेल. जर न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला, तर जुलै महिन्यातच नाशिक जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. ते नाशिक दौऱ्यावर आले असता, पत्रकारांशी बोलत होते.
...............
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.