
DCC Bank News : जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. मात्र, ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी बॅंकेने द्वारका येथील नवी इमारत विक्रीचा प्रस्ताव ठेवला आहे.
वापराविना पडून असलेल्या जिल्हा बॅंकेच्या नवीन तीन मजली इमारतीच्या विक्रीचा प्रस्ताव समोर आला आहे. २००२ ते २००७ या कालावधी मध्ये जिल्हा बॅंकेची ही इमारत बांधण्यात आली होती. आता ही इमारत विकण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून सध्यस्थितीत २८ कोटी रुपये इतके मूल्य या इमारतीचे निर्धारित केले आहे. २०१७ ते २०१८ पर्यंत या इमारतीत काम सुरु होतं. नवीन जागेत बॅंक स्थलांतरित झाल्यामुळे बॅंकेला घरघर लागल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या इमारतीतून काम सुरु झालं आहे.
जिल्हा बॅंकेचे २२०० कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सक्तीच्या कायदेशीर कर्जवसुलीस पुढील तीन महिने स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॅंकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. बॅंकेच्या खात्यात पैसा जमा करुन व्यवहार सुरळीत करण्याठी चाचपणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॅंकेची इमारत विकण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्यामुळे बॅंकेच्या इमारतीवर बॅंक विकणे आहे असा फलक लागण्याची दाट शक्यता आहे.
तत्कालीन संचालकांनी पाच कोटी रुपये खर्च करुन तीनमजली इमारत उभी केली. मात्र, २००२ मध्ये ही जागा एका ट्रस्ट कडून जप्त करण्यात आली. मात्र या इमारतीतून बॅंकेचे काम सुरु झाल्याने बॅंक आर्थिक संकटात सापडली अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरु झाली. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जागृती करुन संचालकांचा गैरसमज दूर केला होता. मात्र, २०१९ मध्ये द्वारका परिसरातील बॅंकचे काम बंद करुन ते पुन्हा सीबीएस येथील जुन्या इमारतीत सुरु झालं आहे. त्यामुळे इमारत तशीच पडून असल्याने विक्री करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे.
दरम्यान आम्ही अंधश्रद्धा मानत नसल्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी म्हटले आहे. बॅंक सुस्थितीत आल्यास इमारत विकण्याची गरज पडणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. ते म्हणाले, बॅंकेचे काम कोणत्याही इमारतीतून झाले तरी काही फरक पडत नाही. त्यावेळी स्टाफ मोठा होता, जागा कमी पडत असल्याने आपण नवीन इमारत बांधली पण आता स्टाफ कमी झाला आहे. बॅंकेचे आर्थिक व्यवहार, कर्जवितरण कमी झाले आहे. त्यामुळे एका बिल्डिगमध्ये काम होत आहे तर दुसरी विकली पाहीजे असा विचार त्यामागे दिसतो आहे.
दरम्यान, जो कुणी जिल्हा बॅंकेची इमारत खरेदी करेल त्यास राज्य सहकारी बॅंककेडून 70 टक्के कर्जपुरवठा करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्यांना केवळ ३० टक्के इतकीच रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. अशी माहिती बॅंक प्रशासनाने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.