

Pakistan import ban : पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारताने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमध्ये उत्पादित किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या भारतातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
असे असतानाही पाकिस्तानमधील माल तिसऱ्या देशामार्गे भारतात आयात करण्याच्या प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पाकिस्तानातून भारतात वस्तू आयात करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. परंतु या बंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला असून तो महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) हाणून पाडला आहे. डीआरआयने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे.
पाकिस्तमधून आणलेला ३६२ मेट्रिक टनांहून अधिकचा सुका खजूर नाशिकमध्ये डीआरआयने जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमधील अंबड येथील 'कंटेनर फ्रेट स्टेशन' (सीएफएस) येथे मुंबईतील एका कंपनीने आयात केलेल्या सुक्या खजुराच्या १३ कंटेनर अडवले. या कंटनेरची तपासणी केली असता हा माल पाकिस्तानमधून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, या कंटेनरमधील माल संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरामार्फत भारतात पाटवण्यात आला होता. मात्र, आयात कागदपत्रांमध्ये या मालाचा उगम संयुक्त अरब अमिराती असल्याची खोटी नोंद करण्यात आली होती.
प्राथमिक तपासात हा माल पाकिस्तानमध्ये उत्पादित झाल्याची बाब लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा सुका खजूर सुरुवातीला पाकिस्तानातील कराची बंदरातून कंटेनरमधून जहाजाद्वारे यूएईतील जेबेल अली बंदरात पाठवण्यात आला होता. त्यानंतर तेथे कागदपत्रांमध्ये फेरफार करुन हा माल दुसऱ्या कंटेनरमध्ये भरण्यात आला. खोट्या कागदपत्रांच्या आधारे आयात नियमांचे उल्लघंन करण्यात आले.
पाकिस्तानी नागरिकांकडून चालवल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून हा खजूर भारतात पाठवण्यात आल्याचा, संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या कारवाईमुळे पाकिस्तानमधून येणाऱ्या मालाचा उगम लवपून तो इतर देशांतून आल्याचे दाखवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कस्टम विभाग व गुप्तचर यंत्रणा या रॅकेटमधील इतर दुव्यांचा शोध घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.